भारतीय जनता पक्षाचा समग्र इतिहास

0
417

एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू

भारतीय जनता पक्षाचाच नव्हे, तर त्यापूर्वीच्या जनसंघाचा आणि त्याही आधीच्या आर्य समाज, रा. स्व. संघ, हिंदू महासभा आदी चळवळींचा समग्र इतिहास नेटकेपणाने मांडणारे शंतनु गुप्ता यांचे हे पुस्तक एक महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरेल.

अठरा कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पक्ष चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला मागे टाकून आज जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष बनला आहे. सध्याच्या संघटनपर्व सदस्यता अभियानाद्वारे ही सदस्यसंख्या आणखी वाढवण्याचा संकल्प आहे. मोबाईलवर निःशुल्क कॉल करून कोणीही पक्षाचा सदस्य बनू शकतो. सत्तेची ऊब मिळत असल्याने गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावेत तसे लोक आजकाल भारतीय जनता पक्षाला चिकटू लागले आहेत. याच भाजपाला पूर्वी शेटजी आणि भटजींचा पक्ष म्हणून हिणवायचे. लोक पक्षाच्या व्यासपीठावर चढायला तयार नसायचे, परंतु संघपरिवारातून आलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा प्रतिकूल परिस्थितीत हाती धरला, टिकवून ठेवला. सत्तालोलुपता आणि नीतीशून्य राजकारणाच्या दलदलीमध्ये पक्षाने ‘पार्टी विथ द डिफरन्स’ म्हणत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

आज मात्र सारेच चित्र पालटून गेलेले आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे या नेत्यांची छायाचित्रे भले पक्षाच्या संकेतस्थळावर आहेत, परंतु सत्तेला प्राधान्य आले आहे आणि ती मिळवण्यासाठीच्या साधनांचा संकोच उरलेला नाही. त्यासाठी पक्षापाशी पैसा ओसंडून वाहतो आहे. साधेपणाची जागा चकाचक कॉर्पोरेट संस्कृतीने आणि दशम्या बांधून पक्षकार्य करणार्‍या खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्यांची जागा उच्चविद्याविभूषित हाय-फाय कार्यकर्त्यांनी घेतली आहे. पक्ष बदलला आहे. पक्षातील संस्कृती बदलली आहे.

एक मात्र खरे की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आज देश पादाक्रांत केलेला आहे. पूर्वीसारखा तो केवळ हिंदी भाषक पट्‌ट्यापुरता वा उत्तर व पश्‍चिम भारतापुरता सीमित उरलेला नाही. आज अगदी ईशान्येपर्यंत पक्षाचा झेंडा फडकतो आहे. भाजपप्रणित एनडीए अजूनही देशातील सतरा राज्यांत सत्तेवर आहे.
भारतीय जनता पक्षाच्या या यशाचा हा समग्र इतिहास सुमारे चारशे पानांच्या एका नेटक्या आणि देखण्या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केला आहे शंतनु गुप्ता यांनी. केवळ भारतीय जनता पक्षाचाच नव्हे, तर भारतातील हिंदुत्वाच्या राजकारणाचा एकूण प्रवास शब्दबद्ध करणारे हे पुस्तक आहे. आर्य समाज – हिंदू महासभा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – भारतीय जनसंघ – भाजप असा जवळजवळ दोन शतकांतला इतिहास अतिशय शिस्तशीर स्वरूपामध्ये या पुस्तकात संकलित करण्यात आलेला असल्याने गुप्ता यांच्या ‘भारतीय जनता पार्टी ः पास्ट, प्रेझेंट अँड फ्यूचर’ या नव्या पुस्तकाला एका उपयुक्त संदर्भग्रंथाचे मोल आलेले आहे.

या देशाला राष्ट्रवादी राजकीय पर्यायाची गरज का भासली? येथपासून सुरूवात करून देशातील संघपूर्व राष्ट्रवादी चळवळी, रा. स्व. संघाची कामगिरी, भारतीय जनसंघाचे योगदान आणि शेवटी भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितिजावर झालेला उदय अशा एकूण पाच भागांतून हा सारा प्रवास मांडण्यात आला आहे.
हजारो वर्षे या देशावर चालत आलेली इस्लामी आक्रमणे, ब्रिटिशांची राजवट, सक्तीची धर्मांतरे, मॅक्समूलरने आर्य आणि द्रविडांमध्ये पाडलेली फूट, मॅकॉलेने नव्या पिढीची या देशाच्या वारशाशी तोडलेली नाळ ही सगळी पार्श्वभूमी विशद करून लेखक सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार या देशाला का आवश्यक वाटला याकडे येतो. १८७५ साली स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाने शुद्धी चळवळ आणि गोहत्या बंदी या दोन मुद्द्यांवर संघर्ष केला त्याची आठवण लेखक करून देतो. स्वामी दयानंद सरस्वतींची हत्या झाली. त्यांच्यानंतर स्वामी श्रद्धानंदांनाही ठार मारले गेेले. पुढे हिंदू महासभेचा उदय झाला. तत्पूर्वी आर्य समाजाचे नेते लाला लजपतराय, लालचंद शादीलाल वगैरेंनी पंजाब हिंदू सभा स्थापन केली. पुढे अंबाला अधिवेशनामध्ये अखिल भारतीय हिंदू महासभा स्थापन करण्याचा ठराव झाला आणि एप्रिल १९१५ मध्ये हरिद्वारच्या कुंभमेळ्यामध्ये अ. भा. हिंदू महासभेची रीतसर स्थापना झाली.

कॉंग्रेसच्या चळवळीचे नेतृत्व टिळकांकडे असेस्तोवर हिंदू हितरक्षण होत होते, परंतु १९२० साली टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर महात्मा गांधींकडे कॉंग्रेसची सूत्रे गेली आणि खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्यासारख्या त्यांच्या एकेका निर्णयामुळे तत्कालीन हिंदू समाज दुखावत गेला असे लेखकाचे प्रतिपादन आहे. १९१८ ते २४ या कालखंडात देशात ठिकठिकाणी झालेल्या दंगलींमुळे कॉंग्रेसपासून एक मोठा घटक दुरावला. बा. सी. मुंजे व डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उभारणी केली व व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चारित्र्यनिर्माणाचे कार्य सुरू केले. हिंदू महासभेचे नेतृत्व सावरकरांनी केले.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाचे योगदान काय असा प्रश्न अनेकदा केला जातो, परंतु १९२१ च्या असहकार आंदोलनात स्वतः हेडगेवारांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती व कोर्टात त्यांनी केलेला बचाव अधिक देशद्रोही असल्याची टिप्पणी न्यायमूर्तींनी केली होती असे लेखक नमूद करतो. १९३० साली झालेल्या मिठाच्या सत्याग्रहातही हेडगेवारांचा आणि असंख्य संघ कार्यकर्त्यांचा व्यक्तिगत सहभाग राहिला होता.

गोळवलकर गुरुजी सरसंघचालक असताना डॉ. पांडुरंग खानखोजे आणि बाळासाहेब देवरसांना त्यांनी जयप्रकाश नारायण यांची भेट घेण्यास पाठवले होते याकडेही लेखकाने लक्ष वेधले आहे. गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली. गोळवलकर गुरुजींना अटक झाली. संघाने राजकीय पक्षाची निर्मिती करून राजकारणात सक्रिय व्हावे असा आग्रह बलराज मधोक, के. आर. मलकानी आदी नेत्यांनी धरला होता, परंतु गोळवलकर गुरुजी व इतरांची त्याच्याशी सहमती नव्हती. हिंदू महासभेचे अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पं. जवाहरलाल नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले होते. परंतु एप्रिल १९५० मध्ये नेहरूंशी मतभेद झाल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ५ मे १९५१ रोजी कलकत्त्यात पीपल्स पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. अखंड भारतासह आठ कलमी कार्यक्रमही त्यांनी आखला. दरम्यान संघपरिवारातून आलेल्या नेत्यांनी जालंधरमध्ये एकत्र जमून भारतीय जनसंघ या नावाने दिल्ली पंजाब शाखा स्थापन करून राजकीय कार्य सुरू केले होते. पुढे सप्टेंबर ५१ मध्ये दिल्लीत झालेल्या अधिवेशनात समविचारी पक्षांच्या एकत्रीकरणाचा विचार मांडला गेला. त्यानुसार प्रजा परिषद, काश्मीर, स्वाधीन जनसंघ, उडिसा आदींना आमंत्रित करण्यात आले. दिल्ली अधिवेशनातच राष्ट्रीय पक्षाची स्थापना करण्यात येत असल्याचे घोषित झाले आणि नाव दिले गेले भारतीय जनसंघ. डॉ. मुखर्जींना भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले गेले.

जनसंघाच्या स्थापनेनंतर दोन महिन्यांतच देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर ५१ मध्ये झाली. २६ राज्यांतील लोकसभेच्या ४८९ जागांसाठी घेण्यात आलेल्या त्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनसंघाने ९३ जागा लढवल्या व तीन जागा जिंकल्या. त्यापैकी दोन बंगालात होत्या, तर एक राजस्थानात. बंगालमध्ये स्वतः डॉ. मुखर्जी आणि देवाप्रसाद घोष जिंकले, तर राजस्थानात उमाशंकर द्विवेदी विजयी झाले. भारतीय जनसंघाला एकूण ३.०६ टक्के मते त्या निवडणुकीत मिळाली. विधानसभांच्या ३२८३ जागांसाठी झालेल्या निवडणुकांत जनसंघाने ७२५ जागा लढवल्या व ३५ जागा जिंकल्या.

काश्मीर आंदोलनात श्यामाप्रसाद मुखर्जींच्या गूूढ मृत्यूनंतर दीनदयाळ उपाध्याय यांच्या रूपाने जनसंघाला नवा नेता लाभला. एकात्म मानवतावादाच्या विचारधारेचे बीजारोपण त्यांनी जनसंघात केले. मात्र, मुखर्जींप्रमाणेच उपाध्याय यांचा मृत्यूही गूढ परिस्थितीत झाला. १० फेब्रुवारी १९६८ रोजी मुगलसराय रेल्वेस्थानकाजवळ उपाध्याय यांचा मृतदेह रूळावर आढळून आला. त्यांच्यानंतर भारतीय जनसंघाची धुरा आली अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे. वाजपेयींनंतर अडवाणी पक्षाचे अध्यक्ष झाले. स्थापनेपासून म्हणजे १९५१ – ५२ पासून १९७१ पर्यंतच्या कालखंडात भारतीय जनसंघ पाच सार्वत्रिक निवडणुका लढला. ५२ साली जिंकलेल्या तीन जागांवरून ७१ साली जिंकलेल्या २२ जागांपर्यंत पक्षाने प्रगती केली. मतांची टक्केवारीही ५२ मधील ३.१ टक्क्यांवरून ७१ मधील ७.४ टक्क्यांपर्यंत वाढली असा सविस्तर लेखाजोखा लेखकाने दिला आहे.

पुढे इंदिरा गांधींना आणीबाणी लागू करण्याची दुर्बुद्धी झाली आणि भारतीय जनसंघ जनता पक्षात विलीन करण्यात आला. ७७ च्या त्या निवडणुकीत जनता पक्षाने ४०५ पैकी २९९ जागा जिंकल्या आणि ४२.१७ टक्के मते मिळवली. जनता पक्षाचा हा प्रयोग मात्र पुढे टिकला नाही. दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून जनता पक्षातील जनसंघाच्या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली. शेवटी एप्रिल ८० मध्ये दिल्लीमध्ये हे नेते एकत्र जमले आणि जन्म झाला भारतीय जनता पक्षाचा. पक्षाचे संस्थापक अध्यक्षपद आले अटलबिहारी वाजपेयींकडे. डिसेंबर ८० मध्ये मुंबईत झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात पन्नास हजारांच्या उपस्थितीत वाजपेयींची अध्यक्षपदी औपचारिक निवड करण्यात आली. त्यापुढचा इतिहास तर आपणा सर्वांपुढे आहेच. ८४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या ५४२ पैकी केवळ दोन जागा जिंकता आल्या. एक होती आंध्र प्रदेशात तर दुसरी गुजरातमध्ये.

मे ८६ मध्ये लालकृष्ण अडवाणी भाजप अध्यक्ष बनले आणि अयोध्या आंदोलनाला हवा देत त्यांनी पक्षाची विजयी घोडदौड सुरू केली. ९० साली पहिल्यांदाच मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाची सरकारे आली. त्यांचे नेतृत्व अनुक्रमे सुंदरलाल पटवा, शांताकुमार आणि भैरोसिंह शेखावत यांनी केले. यापैकी पहिल्या दोन राज्यांतील सरकार स्वबळाचे होते. पुढे १९९६ ते २००४ या काळात केंद्रात वाजपेयींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार बनले. मात्र त्यानंतर पुन्हा २००४ ते २०१३ या काळात पक्षाला केंद्रात विरोधात बसावे लागले. मग २०१४ साली आला नरेंद्र मोदी नावाचा झंझावात आणि २०१९ च्या निवडणुकीतही त्याने थैमान घातले. ३० मे २०१९ रोजी मोदी दुसर्‍यांदा शपथबद्ध झाले तेथे हे पुस्तक संपते.
भारतीय जनता पक्षाचा इतिहास सांगतानाच त्याची संपूर्ण पार्श्वभूमी विस्ताराने या पुस्तकात सांगण्यात आली आहे आणि ते याचे ठळक वैशिष्ट्य आहे. पुस्तकाचे शीर्षक जरी ‘भारतीय जनता पक्ष’ असे असले तरी त्याचा इतिहास केवळ शेवटच्या एका प्रकरणात आलेला आहे. मात्र, त्याची संपूर्ण पार्श्वभूमी आधीच्या प्रकरणांत विस्ताराने मांडली गेली असल्याने अभ्यासकांसाठी हे एक अतिशय उपयुक्त पुस्तक ठरेल.
भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि नेता म्हणवणार्‍या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे. आपण ज्याच्या जोरावर आज सत्ता उपभोगतो आहोत, तो आपला पक्ष कशाप्रकारे निर्माण झाला, कशा प्रकारे पुढे आला आणि त्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी काय काय कष्ट उपसले आहेत, कोणत्या हालअपेष्टा भोगल्या आहेत त्याची ही कहाणी त्यांनी वाचायलाच हवी.