>> सांघिक नौकानयनात
भारताच्या संघाने नौकानयन सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाने ६:१७:१३ अशी आश्वासक वेळ नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. भारताच्या दत्तू भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह या चौकडीने भारताला नौकानयनात (स्कल्स) पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. ६.२०.२८ अशा वेळेसह इंडोनेशियाचा संघ दुसर्या व ६.२२.४१ अशी वेळ नोंदवत थायलंडचा संघ तिसर्या क्रमांकावर राहिला. हिट्स फेरीत पहिल्या हिटमध्ये चार संघांमध्ये भारताने ६.१५.१८ अशी वेळ नोंदवून पहिला क्रमांक प्राप्त केला होता. तर दुसर्या हिट्मध्ये इराणने ६.२२.२७ अशा वेळेसह थेट अंतिप फेरी गाठली होती. उर्वरित सहा संघांना रॅपेशाज फेरीत खेळावे लागले होते. या फेरीत कझाकस्तान व श्रीलंकेचा संघ बाद ठरल्यानंतर उर्वरित चार संघांनी अंतिम फेरी गाठली होती. इराणच्या संघाला ‘हिट’मधील कामगिरीची पुनरावृत्ती अंतिम फेरीत करता आली नाही. त्यांचा संघ पाचव्या स्थानावर राहिला.
याआधी सकाळच्या सत्रात दुष्यंतने पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. दुष्यंतने ७:१८:७६ अशी वेळ नोंदवली. या प्रकारात कोरियाच्या पार्क ह्यूनसू याला सुवर्ण तर हॉंगकॉंगच्या चियू हिन चून याला रौप्यपदक मिळाले. ‘हिट १’मध्ये प्रथम स्थान मिळवताना ७.४३.०८ अशी वेळ नोंदवून त्याने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आपल्या वेळेत कमालीची सुधारणा करताना त्याने आपले सर्वस्व पणाला लावले. स्पर्धा संपताच उच्च रक्तदाबामुळे तो मैदानात कोसळला. पदक समारोह झाल्यानंतर लगेगच त्याला स्ट्रेचरद्वारे इस्पितळात दाखल करण्यात आले. २०१४ साली देखील दुष्यंतने कांस्य जिंकले होते. परंतु, त्यावेळी त्याची वेळ ७.२६.२७ सेकंद अशी होती.
यापाठोपाठ भारताच्या रोहित कुमार- भगवान सिंह जोडीलाही लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कांस्यपदक मिळाले. त्यांनी ७.०४.६१ अशी वेळ नोंदविली. हिटमध्ये ६.५७.७५ अशा वेळेसह दुसर्या स्थानी राहिल्याने त्यांना रॅपेशाज फेरीत उतरावे लागले होते. या फेरीत त्यांनी ७.१४.२३ अशा उत्कृष्ट वेळेसह अव्व्वल राहून अंतिम फेरी गाठली होती.