जगात खेळणी उद्योग सात लाख कोटींचा असून त्यात भारताचा वाटा फारच थोडा आहे. आता भारताला खेळणी उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवूया असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ‘मनकी बात’ या मासिक कार्यक्रमात केले.
देशाला खेळणी उत्पादनाचे जागतिक केंद्र बनविण्याची भारतामध्ये प्रतिभा आणि क्षमता आहे, असे प्रतिपादन मोदी यांनी केले. त्यासाठी देशातील काही विभागांत खेळणी उत्पादनाचा विकास केला जाईल असे ते म्हणाले. कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील चन्नपटणा हे गाव लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशचे कोंडापल्ली हे गावही खेळण्यांसाठी ओळखले जाते. तामीळनाडूतील तंजावर, उत्तर प्रदेशमधील वाराणसी ही सगळी गावे खेळणी उत्पादनाची केंद्रे म्हणून विकसित केली जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.