भारतातील २१ राज्यांत ओमिक्रॉनचा फैलाव

0
19

>> चोवीस तासांत १२८ नवेे रुग्ण, बाधितांची संख्या ७८१

भारत देशात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा फैलाव वेगाने होत असून आता देशातील २१ राज्यांमध्ये ओमिक्रॉन पसरला आहे. गेल्या २४ तासांत देशात ओमिक्रॉनचे १२८ नवीन रुग्ण आढळले असून देशातील ओमिक्रॉनबाधितांची एकूण संख्याआता ७८१ वर पोहोचली आहे. मात्र त्याचसोबत यातील २४१ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. सध्या राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असून महाराष्ट्र राज्य दुसर्‍या क्रमांकावर आहे.

दिल्लीत ओमिक्रॉनची एकूण रुग्णसंख्या २३८ वर गेली आहे. तर महाराष्ट्रात १६७, गुजरात ७३ आणि केरळरमध्ये ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही ६५ वर पोहोचली आहे.
दरम्यान, कोरोनावरील लसीकरण मोहीमेत आतापर्यंत १४३.१५ कोटी नागरिकांना डोस देण्यात आले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही ७७,००२ हजार इतकी आहे. सक्रिय रुग्ण हे एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत १ टक्क्याहूनही कमी आहेत. सध्या ०.२२ टक्के आहे. ही मार्च २०२० हूनही सर्वात कमी टक्केवारी आहे.

दिल्लीत निर्बंध वाढले
दिल्लीत कोरोनाचे आणि ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे दिल्लीतील निर्बंध वाढले आहेत. बस आणि मेट्रोच्या प्रवासावर निर्बंध आले आहेत. ५० टक्के क्षमतेने मेट्रो सेवा सुरू आहे. यामुळे दिल्लीतील अनेक मेट्रो स्टेशन्सबाहेर प्रवाशांच्या रांगा दिसत आहेत.

कोरोनाचे चोवीस तासांत ९ हजार नवीन रुग्ण
कोरोनातून बरे होण्याचा देशातील दर हा ९८.४० टक्के आहे. हा दर मार्च २०२० तुलनेत सर्वाधिक आहे. ओमिक्रॉनचा धोका असताना कोरोनाच्या रुग्णांची संख्या मात्र देशात वाढत आहे. गेल्या २४ तासांत ९ हजार १९५ नवीन रुग्ण आढळले. देशात कोरोना रुग्णांची संख्या ४४.६ टक्क्यांनी वाढली आहे. तर ७ हजार ३४७ रुग्ण बरे झाले आहेत.