भारतातील निम्म्या पात्र नागरिकांचे लसीकरण पूर्ण

0
22

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

>> आतापर्यंत १२७ कोटी नागरिकांना डोस

भारताच्या लसीकरण मोहिमेने आणखी एक मैलाचा दगड गाठताना देशातील पात्र नागरिकांपैकी निम्म्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी ट्वीट करून माहिती दिली.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार देशात आतापर्यंत १२७.६१ कोटींहून अधिक लोकांना लशीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांत १,०४,१८,७०७ जणांना कोरना प्रतिबंधक लस देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरवर पात्र लोकसंख्येपैकी ५०% पेक्षा जास्त लोकांचे आता पूर्णपणे लसीकरण झाले आहे. हा आपल्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. कोरोना विरुद्धची लढाई आपण एकत्र जिंकू असे म्हटले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये
१०० टक्के लसीकरण

देशात कोरोनाविरुद्ध १०० टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. राज्यात तब्बल ५३,८६,३९३ पात्र नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ऑगस्टच्या अखेरीस पात्र १०० टक्के लोकसंख्येला लशीचा पहिला डोस देणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले होते, अशीही माहिती यावेळी सरकारी प्रवक्त्याने दिली.

एकाच दिवसात एक कोटीचे डोस
काल शनिवारी एकाच दिवसात देशामध्ये एक कोटी कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस देण्याची विक्रमी कामगिरी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनीही ट्वीट करत भारतीयांचे आभार मानले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात शनिवारी एक कोटी लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत १२७ कोटी ५५ लाख ७९ हजार २६२ लसीचे डोस देण्यात आलं आहे. भारताने २४ तासांत २.५ कोटी लोकांना लसीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे.