भारताच्या नुकसानीचा एकतरी पुरावा दाखवा

0
4

चुकीच्या वृत्तांकनावरून अजित डोवाल यांनी विदेशी माध्यमांना फटकारले

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे केले स्पष्ट

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. तसेच पाकिस्तानी सैन्याने आगळीक केल्यावर पाकिस्तानी सैन्याच्या हवाई तळांना लक्ष्य करत मोठी हानी घडवून आणली होती. मात्र विदेशी माध्यमांनी पाकने भारताचे मोठे नुकसान केल्याचा दावा केला होता, तो दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी यांनी काल फेटाळून लावला. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचे कुठलेही नुकसान झाले नाही, असे अजित डोवाल यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, पाकने भारताच्या केलेल्या कोणत्याही विध्वंसाचे एकतरी दृश्य किंवा फोटो दाखवण्याचे आव्हान त्यांनी विदेशी माध्यमांना दिले.

अजित डोवाल हे काल आयआयटी मद्रासच्या 62 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरबाबत विदेशी प्रसारमाध्यमांकडून खोट्या बातम्या प्रसारित केल्या गेल्या. मात्र ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताला झालेल्या नुकसानीचा एक फोटो तरी दाखवा. या कारवाईदरम्यान भारताचे कुठलेही नुकसान झालेले नाही, असे डोवाल म्हणाले.

आम्हाला ऑपरेशन सिंदूरबाबत अभिमान आहे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान आम्ही स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला. आम्ही सीमेपलिकडील पाकिस्तानच्या नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यामध्ये सीमेलगतचे एकही ठिकाण नव्हते. आम्ही सर्व लक्ष्यांवर अचून निशाणा साधला. ही संपूर्ण कारवाई 23 मिनिटे चालली. तसेच आम्ही केवळ दहशतवादी अड्ड्यांनाच नष्ट केले, असे अजित डोवाल यांनी स्पष्टपणे सांगितले.

एक काचही तुटली नसेल : डोवाल
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताला झालेल्या नुकसानीचा एक तरी फोटो दाखवा, असे आव्हान विदेशी माध्यमांना देतानाच, या कारवाईदरम्यान भारतात एक काचही तुटली नसेल, असे अजित डोवाल म्हणाले. अनेक विदेशी माध्यम संस्थांनी पाकिस्तानविरुद्ध भारताच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी भारताच्या नुकसानीच्या बातम्या दिल्या. मात्र विदेशी माध्यमे कोणताही फोटो किंवा उपग्रह प्रतिमा दाखवू शकली नाहीत. तसेच काय नुकसान झाले हे देखील सांगू शकले नाहीत, असेही डोवाल म्हणाले.