भारताचे स्वित्झरलँड : डलहौसी – खज्जियार

0
870

– सौ. पौर्णिमा केरकर
देवभूमी हिमाचल प्रदेशाचा प्रवास हा नेहमीच भव्यत्व व दिव्यत्वाचा साक्षात्कार घडविणारा ठरतो. आकाशाशी स्पर्धा करू पाहणार्‍या देवदार वृक्षांनी व्यापलेले आणि एकमेकांत समरस होऊन आपल्या सदासतेज अस्तित्वाने या भूमीत येणार्‍या तमाम पर्यटकांना आपल्यासमोर नतमस्तक व्हायला लावणारे डोंगर म्हणजे आपल्या देशाचे वैभवच आहे. या हिरव्या चैतन्याला पार्श्‍वभूमी लाभलेली आहे चकाकणार्‍या हिमशिखरांची. इथले लोकजीवन पर्वतशिखरांच्या चढ-उतारांशीच जोडले गेले आहे, त्यामुळे संघर्ष, कष्ट, संकटे झेलून परिपक्व झालेले समाजमन या परिसरात पाऊल ठेवल्यानंतर लक्षात येते. नितळ, पारदर्शी प्रसन्नता व्यापून राहिलेल्या या थंड प्रदेशात वर्षाआड एकदा तरी डोळे भरून निसर्ग पाहावा असे मनात आल्यावाचून राहत नाही.‘डलहौसी’ हे असेच एक हिमाचल प्रदेशातील थंड हवेचे ठिकाण. एखाद्या व्यक्तीच्या नावावरून स्थळाचे नाव पर्यटन नकाशावर स्थिर व्हावे असे क्वचितच घडते, परंतु ‘डलहौसी’बाबतीत मात्र हे घडलेले आहे. ब्रिटिशांची राजवट आपल्या देशातून हद्दपार होऊन आज कित्येक दशके उलटलेली आहेत. असे असले तरी डलहौसी आणि परिसराला भेट दिल्यावर आजही स्वातंत्र्यपूर्व कालखंडाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
डलहौसीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी प्रवास करताना शरीराबरोबर मनाचीसुद्धा तयारी करणे अतिशय गरजेचे असते. उष्ण प्रदेशातून थंड- तेसुद्धा अतिथंड- हवेच्या ठिकाणी आपण चाललेलो असतो. सुरुवातीला आपण अगदीच बेफिकीर असतो, पण गाडी एकदा रस्त्यावर धावू लागली, वळणे-वळसे घेतघेत वरवर चढू लागली की एका बाजूला सरळसोट उंच डोंगर तर दुसर्‍या बाजूला नजरसुद्धा पोहोचणार नाही अशी खोल दरी पाहून काळीज दडपून जाते. कितीतरी रानटी वन्यजिवांना, झाडेपेडे, पशुपक्षी, माणसांना घेऊन या सर्वच दर्‍या स्थिरचित्त दिसतात. आभाळातून अलगद उतरून दरीतच रेंगाळणारे ढग अनुभवताना आपले मनसुद्धा कापसासारखे हलके हलके होऊन जाते. हा मूळचाच नितळ प्रदेश. अधिकच चमकदार करणार्‍या उन्हाचे दर्शन देता देता शिडशिडणारा मोठमोठ्या थेंबांचा पाऊस इथे केव्हा आपल्याला दर्शन देईल काही सांगता येत नाही. या सार्‍याचाच अनुभव घेत घेत डलहौसीकडे जाण्यासाठीचा आमचा प्रवास मोठ्या उत्साहात सुरू होता. अवघड वळणे, घनदाट वृक्षराजी यांच्या सोबतीने होणारा हा प्रवास आपल्या देशाच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील आठवणींना जागृत करणारा होता. डलहौसीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात पोहोचेपर्यंत काळोख दाटून आला. अंग गारठवून टाकणारे वारे आणि समोरची नेताजींच्या पुतळ्याच्या मागून दिसणारी दरी अंधुक प्रकाश आणि धुके यांच्या सरमिसळीने एक लावण्यमयी दर्शन देत आमच्या स्वागतासाठी सज्ज होती.
ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी हे स्थळ थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषित केले होते. प्रखर उन्हाळ्यापासून लोकांना कोठेतरी विसावा मिळावा ही भावना मनात बाळगून या जागेचा विकास करण्यात आला. हिमालयातील दौलाधार पर्वतरांगांतील एकूणच पाच पर्वतांशी निगडीत ‘डलहौसी’ ही जवळ जवळ २७०० मीटर समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर स्थित आहे. डलहौसीच्या अवतीभवतीचे बांधकाम, स्थापत्त्यशैली अनुभवताना ब्रिटनच्या संस्कृतीचा ठसा येथे उमटलेला आहे हे जाणवते. एकूणच पाश्‍चात्त्य- त्यातही स्कॉटिश आणि व्हिक्टोरियन पद्धतीचे बांधकाम येथे जागोजागी दिसते. हिमाचल प्रदेशातील चम्बा खोरे हे इतिहास, कला आणि संस्कृती यासाठी प्रसिद्ध आहे. या विलोभनीय प्रदेशाला भेट द्यायची असेल तर डलहौसीला स्पर्श केल्याशिवाय पर्याय नाही. अतिथंड प्रदेशातील गोठवून टाकणार्‍या थंडीचा स्पर्श अनुभवणे हासुद्धा एक थरारच म्हणावा लागेल. ब्रिटिशांची काळीकुट्ट राजवट ही चिरवेदनादायीच होती. त्यातही त्यांची शिस्त, कल्पकता, एखाद्या परिसराचा अभ्यास करून त्यायोगे केलेली पुनर्बांधणी, पर्यटनदृष्ट्या एखाद्या स्थळाचा विकास केला तर मग त्यातून होणारा फायदा, निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचविता मानवाला समाधान कशा तर्‍हेने मिळवून देता येईल या सर्वाचा विचार करून डलहौसीचा केलेला कायापालट ठळकपणाने काही चांगल्या गोष्टी घेऊनच समोर उभा ठाकतो. अशा कितीतरी जागा या परिसरात ब्रिटिशांच्या अस्तित्वाच्या खुणा जोपासत मोठ्या आत्मविश्‍वासाने इतिहास, संस्कृती आणि राजकारण यांचा वारसा मिरवित आहेत. सेंट फ्रान्सिस चर्च, सेंट ऍण्ड्र्यू चर्च, पॅट्रिक चर्च, कॉन्व्हेंट ऑफ सेक्रेड हार्ट ही फक्त मुलींसाठी असलेली निवासी शाळा, सेंट जॉन चर्च वगैरे वास्तूंमधून डलहौसी हे स्थळ जणू काही छोटे ब्रिटन वाटावे असेच भासते. ख्रिश्‍चन समाजाच्या उत्थानासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने कार्यरत असलेले हे चर्च महत्त्वपूर्ण ठरले.
पर्यटकांसाठी डलहौसी हा परिसर जसा विलोभनीय आहे तसाच तो इतर सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेलाही आहे. त्याशिवाय या परिसराला स्पर्श झालाय तो रवींनाथ ठाकूर यांच्या अस्तित्वाचा. तसेच रुद्रयाड किपलिंग, दलाई लामा यांच्या सहवासाने डलहौसीची वैचारिक उंची वाढलेली आहे. चीनने तिबेटियांचा छळ करून त्यांच्यावर अधिकार गाजवायला प्रारंभ केला. छळ असह्य होऊन अनेक तिबेटियनांनी स्थलांतर केले. असे असले तरी त्यांची संस्कृती तेथील बाजारपेठेतून, वास्तूंतून जाणवते. एरव्ही पंजाब प्रांताशी निगडीत असलेला हा प्रदेश कालांतराने त्याच्या भौगोलिक रचनेमुळे हिमाचल प्रदेशाशी जुळून गेला. डलहौसी हे जसे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे, तसेच त्या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक तत्त्वामुळेसुद्धा या प्रदेशाला वेगळेपण लाभलेले आहे. डोळ्यांना थक्क करून सोडणारी विलोभनीय दृष्ये, त्याचप्रमाणे औषधी तत्त्वाने युक्त असलेले पाण्याचे स्रोत हे या जागेचे खास आकर्षण आहे. असे सांगितले जाते की थोर सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस जेव्हा क्षय रोगाने ग्रस्त झाले तेव्हा त्यांचे वास्तव्य डलहौसीला होते. इथले नैसर्गिक पाण्याचे झरे त्यांच्यासाठी वरदान ठरले. आजारपणाच्या कालावधीत ते येथील झर्‍याचे पाणी प्यायचे. एखाद्या स्थळाचा विकास तेथील पारंपरिकतेला, निसर्गाला हानी न पोहोचवितासुद्धा करता येतो याची जाणीव डलहौसीचा प्रवास करताना झाली. आजही पूर्वीसारखीच जर शिस्त बाळगून वाटचाल केली तर हा वारसा येणार्‍या पिढीसाठी शतकानुशतके टिकून राहणार आहे. ‘कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा’ या अजरामर गीताला याच पर्वतरांगांची उत्तुंगता आणि अचलता लाभलेली आहे. अनेक वीरांनी मातृभूमीसाठी आपले प्राण गमविले. त्यांच्या स्मृती जतन करणारे स्मृतीवन व त्यांच्याशीच संलग्न असलेले म्युझियम या भूमीची शौर्यगाथा अधोरेखित करते. भविष्यासाठी ज्यांनी आपल्या वर्तमानकाळाचे हौतात्म्य दिले त्या सगळ्यांच्या खाणाखुणा, शौर्यपदके इथे आपल्याला दिसतात. गुलामगिरीविरुद्ध जे लढले त्यांना आम्ही प्रत्यक्षात पाहिलेले नाही. परंतु त्यांचे अचाट शौर्य, निस्सिम मातृभक्ती मात्र या प्रतीकामधून जाणून घेऊन त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला होते.
डलहौसीपासून चौवीस किलोमीटर अंतरावर असलेले ‘खज्जियार’ हे स्थळ तर ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणूनच ओळखले जाते. सभोवताली घनदाट जंगल व मधोमध असलेला छोटा पठार, त्यावरून वाहणारे नैसर्गिक स्रोत हा नजराणा विलोभनीय असाच आहे. इथे भेट देणार्‍या पर्यटकांना घोड्यावरच्या सफरीचा आनंद मनमुराद लुटता येतो. हिरवे-पांढरे डोंगर, मध्येच पसरलेला हिरवागार गालिचा, वरती डोळ्यांत भरून राहणारे कधी मोकळे असलेले तर कधी भरून आलेले आभाळ पाहाणे हा सारा सुखद सोहळाच असतो.
खास पर्यटकांसाठी म्हणून आभाळभरारी घेण्यासाठी पॅराग्लायडिंगची व्यवस्थाही येथे होती, परंतु नजरचुकीने झालेल्या अपघातात विदेशी पर्यटकाला आलेल्या मृत्यूने या सवलतीला गालबोट लागले. घोड्यावर बसून या पठारापासून एक ते दीड कि.मी. अंतरावर असलेल्या खज्जी नागमंदिराला तसेच महाकाय अशा शंकराच्या मूर्तीला भेट देता येते. धातूपासून बनविलेली ही मोठी शंकराची मूर्ती हे इथले आकर्षण आहे. तलाव, निसर्ग हे इथले वैभव. मनाचा थकवा घालविण्यासाठी व हिरवाईचे वेगवेगळे विभ्रम टिपण्यासाठी या परिसरात कितीही वेळ आपण चालत राहिलो तरी थकवा कसला तो जाणवत नाही. लहान मुलांना स्वैरपणे या ठिकाणी विहार करायला मिळते म्हणूनच ही जागा त्यांना मनःपूर्वक आवडते. त्याचबरोबरीने कोठे चढउतार आहेत, आपली मुले पडणार, त्यांना खरचटणार ही भीतीही मोठ्यांना वाटत नाही एवढी ती जागा सुरक्षित वाटते. खाली मऊ लुसलुशीत हिरवे तृणांकुर असल्याने पावलांना चालण्याचे श्रमसुद्धा जाणवत नाहीत. घनदाट देवदार वृक्षराजी, सौंदर्यमयी हिरवळ यांनी युक्त असलेले खज्जियार दौलधार पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे. पांडव-कौरव यांचा इतिहास येथील मंदिराशी निगडीत आहे. लोकसंस्कृती, निसर्ग, इतिहास यांची एक परंपरा या भूमीला लाभलेली आहे हे येथील प्रवासात लक्षात आले.
चम्बा खोर्‍यातील ही दोन्ही पर्यटनस्थळे घनदाट-गडद वृक्षसंपदेची आगरेच म्हणावी लागतील. चम्बा खोर्‍याला देवी चामुण्डाच्या शक्तिपीठाचा वरदहस्त लाभलेला आहे. गिर्यारोहण, पदभ्रमणासाठी या प्रदेशाचे नेहमीच निसर्गप्रेमींना आकर्षण वाटत आलेले आहे. त्यामुळे इथे पर्यटकांची आणि गिर्यारोहकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. डलहौसीहून खज्जियारच्या प्रवासात वाटेत ठिकठिकाणी असलेले मोठमोठे बर्फाचे दगड हे सर्वांसाठीच आकर्षण ठरले. बर्फाचा ठणकपणा व थंड स्पर्श जरी एक हलकी कळ सर्वांगातून उमटवित गेला तरीसुद्धा तो स्पर्श सर्वांनाच हवाहवासा वाटत राहिला. लहान लहान पांढरेशुभ्र झरे हिरव्या दाट गच्च झाडीच्या पार्श्‍वभूमीवर उठून दिसत होते. हा सारा परिसरच तनामनाला प्रफुल्लित करणारा आहे. ध्वनिप्रदूषणापासून चार हात लांब असलेल्या या स्थळांना भेट दिल्यावर मनःशांती लाभते. इतक्या लांबपर्यंत आपण आलो कशासाठी? या प्रश्‍नाचे उत्तर मनाचाच मनाशी संवाद साधल्यानंतर मिळते. डलहौसीला पाऊल ठेवल्यानंतर जसे आपल्या देशभक्तांचे हौतात्म्य आठवते, नेताजींच्या पावलातली ताकद अनुभवता येते तसेच येथील परिसरात असलेल्या खाणाखुणांमधून गतकालीन इतिहास डोकावताना दिसतो. येथील गांधी चौक, सुभाषचंद्र चौक साक्ष देतात ती अहिंसेची आणि क्रांतीची. रवींद्रनाथांची गीतांजली, गांधीजींची अहिंसा, नेताजींची शिस्त लाभलेली ही भूमी इथे येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला आत्ममग्न, नितळ, पारदर्शी करत असावी असेच मला वाटते. या नितळ नेटक्या परिसराला ब्रिटिश राजवटीची पार्श्‍वभूमी लाभलेली आहे. आखीव-रेखीव व नितळ निळ्या-हिरव्या-पांढर्‍या रंगांनी विनटलेल्या या स्थळांना म्हणूनच ‘भारताचे स्वित्झर्लंड’ असेच संबोधले जाते.