
>> विराट कोहलीचे द्विशतक, रोहितचे शतक
श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याच्या दिशेने टीम इंडिया मार्गक्रमण करत असून आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ विजयी होण्याची शक्यता आहे. भारताला विजयासाठी केवळ ९ गड्यांची आवश्यकता आहे. लंकेचा संघ ३८४ धावांची पिछाडीवर असून डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे.
मुरली विजय व पुजाराच्या शतकानंतर कर्णधार विराट कोहलीने २१३ धावा करत ठोकलेले कसोटीतील पाचवे द्विशतक तसेच पुनरागमन करत असलेल्या रोहित शर्माने नाबाद १०२ धावांची शानदार शतकी खेळी टीम इंडियाची स्थिती भक्कम करण्यास पुरेशी ठरली. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील २०५ धावांना उत्तर देताना भारताने काल आपला पहिला डाव ६ बाद ६१० धावांवर घोषित करत ४०५ धावांची मोठी आघाडी घेतली. तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्या संघाने एक गडी झटपट गमावत २१ धावा केल्या आहेत, करुणारत्ने ११ धावांवर आणि थिरिमाने ९ धावांवर नाबाद आहे.
तत्पूर्वी, तिसर्या दिवशी बारताने आपला पहिला डाव दुसर्या दिवसाच्या २ बाद ३१२ धावांवरून पुढे सुरू केला. दुसर्या दिवशी नाबाद असलेल्या पुजारा आणि कोहलीने या दोघांनी पहिल्या सत्रात लंकेच्या गोलंदाजांचा नेटाने सामना केला. दीडशतकाकडे वाटचाल करत असताना शनाकाच्या एका शानदार यॉर्करवर पुजाराचा त्रिफळा उडाला. पुजाराने आपल्या मॅरेथॉन खेळीदरम्यान ३६२ चेंडूंचा सामना करताना १४ चौकारांसह १४३ धावा केल्या.
पुजारा बाद झाला तेव्हा भारताच्या ३ बाद ३९९ धावा झाल्या होत्या. त्यानंतर मैदानात आलेल्या रहाणेची अपयशाची मालिका यावेळीदेखील कायम राहिली. फक्त २ धावा करत परेराच्या गोलंदाजीवर करुणारत्नेकडे झेल सोपवून त्याने तंबूचा रस्ता धरला. यानंतर रोहित शर्माने दमदार खेळी करत संघातील निवड सार्थ ठरवली. रोहित आणि कोहलीमध्ये दीडशतकी भागीदारी झाली. यादरम्यान कोहलीने आपले पाचवे दुहेरी शतक पूर्ण केले. द्विशतकानंतर कोहली बाद झाला. या खेळीदरम्यान कोहलीने २६७ चेंडूंचा सामना करताना १७ चौकार आणि दोन षटकारांसह ७९.७८च्या सरासरीने २१३ धावा केल्या. कोहलीनंतर रोहित शर्मानेही कसोटीमधील आपले तिसरे शतक झळकावले. तब्बल १३ महिन्यानंतर संघात स्थान मिळालेल्या रोहितने आपले पुनरागमन शतकी खेळीने साजरे केले. रोहितने १६० चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १०२ धावा ठोकल्या. रोहितच्या शतकानंतर भारताने आपला पहिला डाव ६ बाद ६१० धावांवर घोषित केला.
धावफलक
श्रीलंका पहिला डाव ः सर्वबाद २०५
भारत पहिला डाव ः (२ बाद ३१२ वरून) ः चेतेश्वर पुजारा त्रि. गो. शनका १४३, विराट कोहली झे. थिरिमाने गो. परेरा २१३, अजिंक्य रहाणे झे. करुणारत्ने गो. परेरा २, रोहित शर्मा नाबाद १०२, रविचंद्रन अश्विन त्रि. गो. परेरा ५, वृध्दिमान साहा नाबाद १, अवांतर ९, एकूण १७६.१ षटकांत ६ बाद ६१०
गोलंदाजी ः सुरंगा लकमल २९-२-१११-०, लाहिरु गमागे ३५-८-९७-१, रंगना हेराथ ३९-११-८१-१, दासुन शनका २६.१-४-१०३-१, दिलरुवान परेरा ४५-२-२०२-३, दिमुथ करुणारत्ने २-०-८-०
श्रीलंका दुसरा डाव ः सदीरा समरविक्रमा त्रि. गो. ईशांत ०, दिमुथ करुणारत्ने नाबाद ११, लाहिरु थिरिमाने नाबाद ९, अवांतर १, एकूण ९ षटकांत १ बाद २१
गोलंदाजी ः ईशांत शर्मा ४-१-१५-१, रविचंद्रन अश्विन ४-३-५-०, रवींद्र जडेजा १-१-०-०
दासुन शनकाला दंड
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दासुन शनका याला चेंडू कुुरतडल्याप्रकरणी सामना मानधनातील ७५ टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे. तसेच त्याच्या खात्यात ३ दोषांकदेखील जमा करण्यात आले आहेत. चेंडूच्या ‘सीम’ जवळचा भाग नखांनी कुरतडतानाचे चित्र दूरचित्रवाणीवर दाखवण्यात आल्यानंतर पंचांनी याची दखल घेत सामनाधिकार्यांना आपला अहवाल सोपविला. यानंतर त्याच्यावर कारवाई झाली.