श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना एक डाव व २३९ धावांनी जिंकून भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत काल अपेक्षेप्रमाणे १-० अशी आघाडी घेतली. ४०५ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर श्रीलंकेचा दुसरा डाव काल १६६ धावांत संपला.
रविवारी खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने १ गडी गमावत २१ धावा केल्या होत्या. काल त्यांच्याकडून चिवट प्रतिकाराची अपेक्षा होती. परंतु, पहिल्या डावापेक्षा सुमार कामगिरी त्यांनी दुसर्या डावात केली. दिमुथ करुणारत्ने (१८) बाद होणारा कालचा पहिला फलंदाज ठरला. शॉर्ट लेगला विजयने त्याचा सुरेख झेल टिपला. कर्णधार दिनेश चंदीमल (६१) व तळाला सुरंगा लकमल (नाबाद ३१) यांनी श्रीलंकेचा पराभव लांबवण्याचे काम केले. भारताकडून दुसर्या डावात रविचंद्रन अश्विनने ४ तर ईशांत, जडेजा व उमेशने प्रत्येकी २ गडी बाद केले. श्रीलंकेने आपल्या पहिल्या डावात २०५ धावा केल्यानंतर भारताने विजय, पुजारा, रोहित यांच्या शतकांच्या व विराटच्या द्विशतकाच्या बळावर आपला पहिला डाव ६ बाद ६१० धावांवर घोषित केला होता.
शानदार द्विशतक ठोकलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या सामन्याचा मानकरी ठरला. मालिकेतील तिसरा सामना २ डिसेंबरपासून दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर खेळविला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका पहिला डाव ः सर्वबाद २०५, भारत पहिला डाव ः ६ बाद ६१० घोषित, श्रीलंका दुसरा डाव ः (१ बाद २१ वरून) ः करुणारत्ने १८, थिरिमाने २३, मॅथ्यूज १०, चंदीमल ६१, डिकवेला ४, शनका १७, दिलरुवान ०, हेराथ ०, लकमल ३१, गमागे ०, अवांतर २, एकूण ४९.३ षटकांत सर्वबाद १६६
गोलंदाजी ः ईशांत शर्मा १२-४-४३-२, रविचंद्रन अश्विन १७.३-४-६३-४, रवींद्र जडेजा ११-५-२८-२, उमेश यादव ९-२-३०-२