भारताचा मोस्ट वॉटेंड दहशतवादी मोहम्मद कासिम गुज्जर याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळी मारून हत्या केली आहे. जेव्हा मोहम्मद गुज्जर याची हत्या करण्यात आली तेव्हा तो आपल्या बाईकवरून जात होता. याचवेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. कासिम गुज्जर हा मूळ जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्याचा रहिवासी होता, तो लष्कर-ए तोयबा या संघटनेचा दहशतवादी होता. तो गेल्या अनेक दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपून बसला होता. काल रविवारी त्याची पेशावरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली.
भारत सरकारकडून मार्च 2024 मध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड असलेल्या मोहम्मद कासिम गुज्जर ऊर्फ सलमान ऊर्फ सुलेमान याला यूएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले होते. या संदर्भात भारताच्या गृहमंत्रालयाने ट्विट करत माहिती दिली होती.
लष्कर ए तोयबासाठी काम करणारा मोहम्मद कासिम गुज्जर हा अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार आहे, या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे, भारताविरोधात कट कारस्थानामध्ये त्याचा सहभाग होता. त्याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे. भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी प्रयत्न, दहशतवादी हल्ल्यांची योजना बनवणे तसेच शस्त्रांची तस्करी असे त्यावर भारतामध्ये आरोप होते.