भारताचा न्यूझीलंडवर विजय

0
99

>> रुपिंदरपालचे दोन गोल

>> दुसरा सामना शनिवारी

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने काल गुरुवारी विजयी सलामी दिली. बंगळुरु कॅम्पसमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर भारताने किवी संघाला ४-२ असे पराभूत केले.

भारताकडून रुपिंदरपाल सिंग (दुसरे मिनिट व ३४वे मिनिट), मनदीप सिंग (१५वे मिनिट) व हरमनप्रीत सिंग (३८वे मिनिट) यांनी गोलजाळीचा वेध घेतला. पाहुण्यांकडून स्टीफन जेनेस (२६वे व ५५वे मिनिट) याने दोन्ही गोल नोंदविले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेननंतर प्रथमच भारतीय संघात खेळणार्‍या रुपिंदरने भारताला मिळालेला पहिलाच पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. मैदानालगत जोरदार फटका लगावताना त्याने न्यूझीलंडचा गोलरक्षक रिचर्ड जॉईल याला चकवताना भारताला १-० असे आघाडीवर नेले. सातव्या मिनिटाला पाहुण्यांना बरोबरीची चांगली संधी मिळाली होती.

परंतु, भारताचा दक्ष गोलरक्षक कृष्णन पाठक याने न्यूझीलंडचा हल्ला परतवून लावला. १५व्या मिनिटाला भारताने आपली आघाडी दुप्पट केली. मनप्रीत सिंगच्या अचूक क्रॉसवर मनदीप सिंगने चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवत भारताची पकड मजबूत केली. २२व्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण, समन्वयाच्या अभावामुळे भारताला ही संधी गमवावी लागली. २६व्या मिनिटाला जेनेस याने अप्रतिम मैदानी गोल करत पिछाडी कमी केली. मध्यंतरापर्यंत भारतीय संघ २-१ असा आघाडीवर होता.

मध्यंतरानंतर आघाडीपटू एसव्ही सुनीलने भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. ड्रॅगफ्लिकर रुपिंदर पालने चेंडूला गोलजाळीच्या उजव्या कोपर्‍याची दिशा दाखवत भारताची आघाडी ३-१ अशी फुगवली. ३८व्या मिनिटाला भारताने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. हरमनप्रीत सिंगने आपल्या वेगवान फटक्याने गोलरक्षकाला नामोहरम करत हा गोल नोंदविला.

स्टीफन जेनेस याने सामन्याच्या अंतिम मिनिटांत भारताचा बचाव पुन्हा एकदा भेदला. यावेळी बदली गोलरक्षक सूरज कारकेरा याच्या पॅडला लागून चेंडू गोलजाळीत विसावला.

सामन्याच्या शेवटच्या ५० सेकंदात न्यूझीलंडने लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर पटकावले. परंतु, दोन्हीेवेळी गोलरक्षक कारकेरा भारताच्या मदतीला धावला. मालिकेतील दुसरा सामना शनिवार २१ रोजी खेळविला जाणार आहे.