मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजा यांनी केलेल्या भेदक मार्याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव काल पाचया दिवशी १९१ धावांत गुंडाळत २०३ धावांंंंंंनी विजय साकारला. भारताने आफ्रिकेसमोर विजयासाठी ३९५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ द्विशतकी वेसदेखील ओलांडू शकला नाही. मोहम्मद शमीने दुसर्या डावात आफ्रिकेचा निम्मा संघ अवघ्या २१ धावा मोजून माघारी धाडला. दुसर्या डावात आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी पुरती निराशा केली. मात्र अखेरच्या फळीत डॅन पिद, मुथूसामी यांनी झुंज देत नवव्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करत भारताचा विजय लांबवला. रबाडाने १८ धावांचे योगदान देत शेवटच्या गड्यासाठी ३० धावांची भागी रचली. मात्र शमीने डॅन पिद व रबाडाला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसर्या डावात रवींद्र जडेजाने ४ बळी घेत चांगली शमीला चांगली साथ दिली.
३७ षटकारांचा सामना
भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेला पहिला कसोटी सामना षटकारांच्या संख्येमुळे गाजला. कसोटी क्रिकेेटच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक ३७ षटकारांची नोंद या सामन्यात झाली. यापूर्वी पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यात २०१४-१५ मोसमातील लढतीत ३५ षटकार लगावण्यात आले होते. भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात संपलेल्या लढतीत सर्वादिक षटकार रोहित शर्मा (१३) याने लगावले. मयंक अगरवालने ६, डीन एल्गार व रवींद्र जडेजाने प्रत्येकी ४, पुजारा व क्विंटन डी कॉकने प्रत्येकी २, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, फाफ ड्युप्लेसी, ऐडन मार्करम, डॅन पिद व रबाडा यांनी प्रत्येकी १ षटकार लगावला.
भारताचे अव्वलस्थान भक्कम
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ३ पैकी ३ सामने जिंकून भारताने आपली गुणसंख्या १६० केली आहे. दोन सामने खेळून न्यूझीलंड ६० गुणांसह दुसर्या क्रमांकावर आहे. २ सामन्यांतून श्रीलंकेचेदेखील समान ६० गुण आहेत. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांचे प्रत्येकी ५६ गुण झाले आहेत. परंतु, त्यांनी पाच सामने खेळले आहेत.
२३ वर्षांनंतर प्रथमच
भारतीय भूमीवर चौथ्या डावात वेगवान गोलंदाजाने पाच बळी घेण्याची घटना तब्बल २३ वर्षांनंतर काल प्रथमच घडली. मोहम्मद शमीने हा कारनामा केला. १९९६ साली जवागल श्रीनाथने अहमदाबाद कसोटीच्या चौथ्या डावात द. आफ्रिकेविरुद्ध २१ धावांत ६ बळी घेतले होते. कर्सन घावरी (१९७७), कपिलदेव (१९८१), मदन लाल (१९८१) यांचादेखील या यादीत समावेश आहे. २०१८ सालापासून शमीने कसोटीच्या पहिल्या डावात टुकार कामगिरी केली आहे. ३७.५६च्या सरासरीने व ७०.५च्या खराब स्ट्राईक रेटने १६ डावांत त्याला केवळ २३ बळी घेता आले आहेत. या तुलनेत त्याची दुसर्या डावातील कामगिरी भन्नाट राहिली आहे. १५ डावात ३२.१च्या स्ट्राईकरेटने, १७.७०च्या दमदार सरासरीने त्याने ४० बळी घेतले आहेत.
धावफलक
भारत पहिला डाव ः ७ बाद ५०२ घोषित
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः सर्वबाद ४३१
भारत दुसरा डाव ः ४ बाद ३२३ घोषित
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव ः (१ बाद ११ वरून) ः ऐडन मार्करम झे. व गो. जडेजा ३९, थ्युनिस डी ब्रुईन त्रि. गो. अश्विन १०, तेंबा बवुमा त्रि. गो. शमी ०, फाफ ड्युप्लेसी त्रि. गो. शमी १३, क्विंटन डी कॉक त्रि. गो. शमी ०, सेनुरन मुथूसामी नाबाद ४९, व्हर्नोन फिलेंडर पायचीत गो. जडेजा ०, केशव महाराज पायचीत गो. जडेजा ०, डॅन पिद त्रि. गो. शमी ५६, कगिसो रबाडा झे. साहा गो. शमी १८, अवांतर ४, एकूण ६३.५ षटकांत सर्वबाद १९१
गोलंदाजी ः रविचंद्रन अश्विन २०-५-४४-१, रवींद्र जडेजा २५-६-८७-४, मोहम्मद शमी १०.५-२-३५-५, इशांत शर्मा ७-२-१८-०, रोहित शर्मा १-०-३-०
सेनुरन मुथूसामीची कमाल
कसोटी पदार्पणाच्या दोन्ही डावात ३० किंवा जास्त धावा करून नाबाद राहणारा केवळ चौथा खेळाडू होण्याचा मान द. आफ्रिकेचा अष्टपैलू सेनुरन मुथूसामी याने मिळविला आहे. त्याने भारताविरुद्धच्या पहिल्या डावात ३३ व दुसर्या डावात ४९ धावा केल्या. या यादीत ऑस्ट्रेलियाचा अल्बर्ट ट्रॉट (३८ व ७२, १८९५, वि. इंग्लंड), जॅकी वेस्ट इंडीजचा जॅकी ग्रांट (५३ व ७१, १९३० वि. ऑस्ट्रेलिया), पाकिस्तानचा अधर महमूद (१२८ व ५०, १९९७, वि. द. आफ्रिका) यांचा समावेश आहे.
रविचंद्रन अश्विनने केली
मुथय्या मुरलीधरनशी बरोबरी
भारताचा ऑफस्पिन गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने कसोटी क्रिकेटमध्ये ३५० बळींचा टप्पा काल रविवारी पूर्ण केला. दक्षिण आफ्रिकेच्या थ्युनीस डी ब्रुईन याला दुसर्या डावात वैयक्तिक १० धावांवर त्रिफळाबाद करत त्याने आपला साडेतीनशेवा बळी मिळविला. या कामगिरीसह त्याने सर्वांत कमी डावांत ३५० बळी घेणार्या श्रीलंकेचा दिग्गज ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन याच्याशी बरोबरी केली. मुरली व अश्विन यांनी समान ६६ कसोटींत ३५० बळी पूर्ण केले. यासाठी मुरलीने अश्विनपेक्षा १८ डाव कमी खेळले होते. परंतु, अश्विनने (१८६८५ चेंडू) मुरलीपेक्षा (२१६३२ चेंडू) जवळपास ३ हजार चेंडू कमी टाकून साडेतीनशेचा टप्पा गाठला आहे. याव्यतिरिक्त अश्विनने पदार्पणानंतर सात वर्षे ३३२ दिवसांत तर मुरलीने ९ वर्षे ९ दिवसांत साडेतीनशे कसोटी बळी पूर्ण केले होते. मुरलीने २०१० साली कसोटी निवृत्ती स्वीकारली असून त्याच्या नावावर एकूण ८०० कसोटी बळी आहेत. यापूर्वी नोव्हेंबर २०१७ मध्ये त्याने ५४ कसोटींत ३०० बळी घेताना ऑस्ट्रेलियाचे दिग्गज डॅनिस लिली यांचा विक्रम मोडला होता.