नेरूल, बेताळभाटी, ड्युन्स, चिंचणीचे विजय

0
114

>> जीएफए १६ वर्षांखालील लीग फुटबॉल

जीएफए १६ वर्षांखालील लीग स्पर्धेत काल रविवारी नेरूल स्पोटर्‌‌स क्लबने साळगाव स्पोर्टिंग क्लबचा ५-२ असा पराभव केला. अस्नोडा मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. नेरुलने सुरुवातीपासूनच वेग पकडताना ११व्या मिनिटाला कमलेश चोपडेकर याच्याकरवी गोलकोंडी फोडली. यानंतर सातच मिनिटांनी त्याने आपला दुसरा गोल केला. साळगावच्या आकाश लमाणी याने पिछाडी १-२ अशी कमी केली. मध्यंतरापूर्वी रितेश लोणी याने संघाचा तिसरा गोल केला.

पहिल्या सत्राअखेर नेरुलचा संघ ३-१ असा आघाडीवर होता. ४३व्या मिनिटाला आकाश लमाणी याने साळगावचा व स्वतःचा दुसरा गोल केला. साळगावने यानंतर आक्रमक खेळ दाखवताना बरोबरीचे केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. नेरुलच्या खान याने संघाचा चौथा गोल केला. वरुण विश्‍वकर्माच्या स्वयंगोलामुळे नेरुलला पाचव्या गोलाची नोंद करता आली.

डॉन बॉस्को मैदानावर ड्युन्स स्पोटर्‌‌स क्लबने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत डॉन बॉस्को ओरेटरीला ३-२ असे नमविले. सामन्यातील पाचही गोलांची नोंद पहिल्या सत्रात झाली. लिथन सिल्वेरा याने ड्युन्सला आघाडीवर नेल्यानंतर स्वयान केरकर याने १२व्या मिनिटाला ड्युन्सला बरोबरीत आणले. निजाम शेख याने १७व्या मिनिटाला गोल करत पुन्हा डीबीओला एका गोलाची आघाडी मिळवून दिली. परंतु, या आघाडीचा आनंद त्यांना फार काळ उपभोगता आला नाही. प्रणेश अश्‍वेकर व चंद्रकांत गडेकर यांनी लागोपाठ गोल करत ड्युन्सला ३-२ असे विजयी केले.

फातोर्डाच्या कृत्रिम टर्फ मैदानावर बेताळभाटी एससीने कुठ्ठाळी व्हिलेजर्सला २-१ असा धक्का दिला. विजयी संघाकडून रोहन यादव व ख्राईस्ट रिबेलो यांनी गोलजाळीचा वेध घेतला तर इव्हान कुन्हा याने कुठ्ठाळीचा एकमेव गोल केला. धर्मापूर मैदानावर सीआरसी चिंचणीने गोलांचा पाऊस पाडताना युनायटेड क्लब ऑफ तळावलीला ११-० असे पराजित केले. विजयी संघाकडून लार्सन रिबेलो याने पाच गोल झळकावले. गौरव चौहान व प्रेस्टन डिसोझा यांनी प्रत्येकी दोन तर लायसन लैताव व प्रेम बकुम यांनी प्रत्येकी एक गोल केला. मध्यंतरापर्यंत विजेता संघ ५-० असा आघाडीवर होता.