भारताचा ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय

0
208

बदली खेळाडू युजवेंद्र चहलने घेतलेले तीन बळी, रवींद्र जडेजाने मोक्याच्या क्षणी केलेली फटकेबाजी तसेच पदार्पणवीर नटराजनच्या भेदक मार्‍याच्या जोरावर भारताने काल शुक्रवारी झालेल्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव केला. भारताने विजयासाठी ठेवलेले १६२ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही. त्यांना २० षटकांत ७ बाद १५० धावांपर्यंतच मजल मारता आली.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी निवडल्यानंतर भारताची सुरुवात खराब झाली. शिखर धवन व कोहली यांना दुहेरी धावसंख्या करता आली नाही. लोकेश राहुलने अर्धशतक झळकावत ५१ धावा जमवल्या. जडेजाने केवळ २३ चेंडूंत नाबाद ४४ धावा चोपत भारताला सन्मानजनक स्थिती गाठून दिली. धावांचा पाठलाग करताना शॉर्ट व फिंच यांनी कांगारूंना ५६ धावांची सलामी दिली. मनीष पांडे व विराटने झेल सोडून या दोघांना मदत केली. चहलने ही जोडी फोडत कांगारूंच्या गळतीला सुरुवात केली. धोकादायक मॅक्सवेलला नटराजनने पायचीत केले तर सॅमसनच्या सुरेख झेलामुळे स्टीव स्मिथ बाद झाला. मालिकेतील दुसरा सामना रविवार ६ रोजी खेळविला जाणार आहे.

‘कन्कशन सबस्टिट्यूट’ ठरला सामनावीर
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व संघ व्यवस्थापनाने ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ या आयसीसीच्या नव्या नियमाचा लाभ चाणाक्षपणे उठवला. रवींद्र जडेजाच्या जागी आलेल्या लेगस्पिनर युजवेंद्र चहलने खेळपट्टीकडून मिळालेल्या मदतीचा लाभ उठवत ३ बळी घेत सामनावीर किताब पटकावला. क्रिकेटच्या इतिहासात ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ म्हणून येऊन सामनावीर ठरलेला तो पहिलाच खेळाडू ठरला. पायात आलेल्या क्रॅम्पमुळे जडेजा क्षेत्ररक्षण करण्याची शक्यता फारच कमी होती. त्याच्या जागी बदली क्षेत्ररक्षक भारताला ठेवावा लागला असता. त्यातच डावातील शेवटच्या षटकात स्टार्कचा बाऊन्सर भारताला ‘कन्कशन सबस्टिट्यूट’चा लाभ मिळवून देण्यास पुरेसा ठरला. बदली खेळाडू म्हणून सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी चहलला मान्यता दिल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. भारताचा डाव संपताच भारतीय संघाचे डॉक्टर व बीसीसीआयचे उत्तेजक द्रव्य विभागाचे व्यवस्थापक अभिजित साळवी व फिजियो नितीन पटेल यांनी जडेजाची तपासणी केली. चेंडू डोक्यावर आदळल्यानंतर जडेजा सैरभर झाला होता, असे संजू सॅमसन याने भारताचा डाव संपल्यानंतर सांगितले. सामना संपल्यानंतरही जडेजाच्या स्थितीत सुधारणा झाली नव्हती, असे विराटने स्पष्ट केले.

धावफलक
भारत ः लोकेश राहुल झे. एबॉट गो. हेन्रिकेस ५१ (४० चेंडू, ५ चौकार, १ षटकार), शिखर धवन त्रि. गो. स्टार्क १, विराट कोहली झे. व गो. स्वॅपसन ९, संजू सॅमसन झे. स्वॅपसन गो. हेन्रिकेस २३, मनीष पांडे झे. हेझलवूड गो. झॅम्पा २, हार्दिक पंड्या झे. स्मिथ गो. हेन्रिकेस १६, रवींद्र जडेजा नाबाद ४४ (२३ चेंडू, ५ चौकार, १ षटकार), वॉशिंग्टन सुंदर झे. एबॉट गो. स्टार्क ७, दीपक चहर नाबाद ०, अवांतर ८, एकूण २० षटकांत ७ बाद १६१
गोलंदाजी ः मिचेल स्टार्क ४-०-३४-२, जोश हेझलवूड ४-०-३९-०, ऍडम झॅम्पा ४-०-२०-१, शॉन एबॉट २-०-२३-०, मिचेल स्वॅपसन २-०-२१-१, मोझेस हेन्रिकेस ४-०-२२-३
ऑस्ट्रेलिया ः डार्सी शॉर्ट झे. पंड्या गो. नटराजन ३४, ऍरोन फिंच झे. पंड्या गो. चहल ३५ (२६ चेंडू, ५ चौकार, १ षटकार), स्टीव स्मिथ झे. सॅमसन गो. चहल १२, ग्लेन मॅक्सवेल पायचीत गो. नटराजन २, मोझेस हेन्रिकेस पायचीत गो. चहर ३० (२० चेंडू, १ चौकार, १ षटकार), मॅथ्यू वेड झे. कोहली गो. चहल ७, शॉन एबॉट नाबाद १२, मिचेल स्टार्क त्रि. गो. नटराजन १, मिचेल स्वॅपसन नाबाद १२, अवांतर ५, एकूण २० षटकांत ७ बाद १५०
गोलंदाजी ः दीपक चहर ४-०-२९-१, वॉशिंग्टन सुंदर ४-०-१६-०, मोहम्मद शमी ४-०-४६-०, थंगरसू नटराजन ४-०-३०-३, युजवेंद्र चहल ४-०-२५-३