भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा

0
113
  • अझलन शाह चषक हॉकी

२५व्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या लीग सामन्यात भारतीय हॉकी संघाने अधिकारवाणीच्या खेळीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५-१ असा धुव्वा उडविला.
पाकिस्तानविरुध्दचा गेल्या सहा वर्षांतील हा सर्वांत मोठा विजय होय. २०१०मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकूल मेळ्यात भारताने पाकिस्तानवर ७-४ असा विजय मिळविला होता.
स्पर्धेंतील सर्वोत्तम खेळीचे दर्शन घडविलेल्या भारताने चौथ्याच मिनिटाला, मनप्रीत सिंगने नोंदलेल्या गोलवर आघाडी घेतली. तथापि, सातव्या मिनिटाला कर्णधार मुहम्मद इरफानने पाकिस्तानचा बरोबरीचा गोल नोंदला.
भारतीय संघाने नंतर बहारदार खेळीत अधिपत्य गाजविले. एसव्ही सुनिलने १० आणि ४१व्या मिनिटाला गोल नोंदविले. ५०व्या मिनिटाला तलविंदर सिंगने चौथ्या गोल केला तर ५४व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी कॉर्नरवर पाचवा गोल केला. ५५व्या मिनिटाला रुपिंदरपाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल नोंदला असता वा ६९व्या मिनिटाला रमणदीप सिंहने डिफ्लेक्शवर नोंदलेला गोल पंचानी अग्राहय ठरविला नसता तर भारताचा विजय याहून मोठा ठरला
असता.
या विजयासह भारताने चार सामन्यातील ९ गुणासह दुसर्‍या क्रमावर झेप घेतली.
भारताचे शेष दोन लीग सामने न्युझीलँड (दि. १३) आणि मलेशिया (दि. १५) यांच्याविरुध्द होतील.
चारही सामने जिंकलेला विजेता ऑस्ट्रेलिया १२ गुणासह अग्रस्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीच्या दिशेने कूच करताना ओसेनिया प्रतिस्पर्धी न्युझीलँडचा १-० असा पराभव केला. न्युझीलँडचे पाच सामन्यातून ८ गुण झाले आहेत.