>> गोव्यालाही लाभ मिळणार
>> अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी साधनसुविधांना चालना
सुमारे सात लाख कोटी रुपये खर्चाच्या ८३ हजार कि. मी. च्या रस्त्यांच्या उभारणीस केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले. येत्या पाच वर्षांत हे महामार्गांचे जाळे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. या अंतर्गत रस्ते, महामार्ग व पूल यांचाही समावेश असेल. पहिल्या टप्प्यात सन २०२२ पर्यंत २४,८०० कि. मी. चे रस्ते उभारले जातील. १८३७ कि. मी.चे एक्स्प्रेस वे ही उभारले जाणार आहेत.
एकूण २१०० किलोमीटरचे किनारी महामार्ग सरकार उभारू इच्छित असून त्यामुळे किनारी प्रदेशांचा पर्यटन व औद्योगिकदृष्ट्या विकास होईल असे जेटली यांनी सांगितले. २ हजार किलोमीटरचे बंदरांना जोडणारे महामार्गही उभारण्याचा सरकारचा मानस आहे. सरकारच्या या साधनसुविधा निर्मितीमध्ये ‘सागरमाला’ खालील प्रकल्पही अंतर्भूत आहेत.
‘भारतमाला’ ची घोषणा मोदी सरकारने दोन वर्षांपूर्वी केली होती.
या रस्ते उभारणीसाठीचा अर्धा निधी खुल्या बाजारपेठेतून मिळवण्यात येणार असून उर्वरित रस्ते निधी व टोलमधून मिळविला जाईल. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) खाली सप्टेंबर महिन्यात सरकारला ९२,१५० कोटींचा महसूल मिळाल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
बँकांना भांडवली मदत
अनुत्पादिक मालमत्तांमुळे जेरीस आलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना केंद्र सरकारने २ लाख ११ हजार कोटींची भांडवली मदत घोषित केली आहे.
ऑगस्ट व सप्टेंबरचे
जीएसटी विलंब शुल्क रद्द
ऑगस्ट आणि सप्टेंबरची जीएसटीआर- ३ बी विवरणपत्रे भरण्यात उशीर झालेला असल्यास त्यासाठीचे विलंब शुल्क रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्यात आला आहे. ज्यांनी यापूर्वीच सदर विलंब शुल्क भरले असेल त्यांना विलंब शुल्काची रक्कम परत केली जाईल.
गोव्यातील महामार्गांचाही समावेश
गोव्यातील २६५ कि.मी. रस्त्याचा ‘भारतमाला’ प्रकल्पाद्वारे विकास केला जाणार आहे. यात पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे व राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणाचा समावेश आहे. मुंबई – गोवा – कोचीन महामार्गाचा व गोवा – बेळगाव महामार्गालाही समाविष्ट करण्यात आले आहे. मुंबई – गोवा – कोचीन महामार्गाची लांबी १३४६ किलोमीटर असून सध्या मुंबईहून कोचीनला जाण्यासाठी पुणे – बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गाचा आधार घेतला जातो. त्या मार्गे सदर अंतर १५३७ कि. मी. आहे. मात्र, मुंबई – गोवा रस्ता खराब असल्याने १३४६ चे अंतर त्या मार्गे कापण्यास २९ तास लागतात, तर हेच अंतर पुणे बेंगलुरू मार्गाने गेल्यास २०० किलोमीटर अंतर जास्त असूनही २४ तासांत ते कापता येते.