>> दिव्याज फाऊंडेशनतर्फेही मोहिमेचे आयोजन
>> जॅकी श्रॉफ, अमृता फडवणीस, अनुराग ठाकूर यांचा सहभाग
मुंबईस्थित भामला फाऊंडेशन व दिव्याज फाऊंडेन या बिगर सरकारी संघटनांच्यावतीने आज सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वा.पासून पणजीतील मिरामार किनार्याच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती काल इफ्फीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेत भामला फाऊंडेशनचे असिफ भामला, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसोझा व दिव्यांज फाऊंडेशनसाठी काम करणार्या अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी, आपण जसे आपल्या शरीराची स्वच्छता करतो त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील कचरा काढून साफसफाई करणे ही देखील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. ही भूमी म्हणजे आपली माता असून तिला स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. अमृता फडणवीस यांनी यावेळी, सगळेच जण गोव्यावर प्रेम करतात. गोवा हे एक नंदनवनच आहे आणि ते स्वच्छ ठेवायला हवे. यंदा इफ्फीत आम्ही ह्या समाजकार्यासाठी हाक देण्यास आलेलो असून गोव्यातील लोकांनी मोठ्या संख्येने या साफसफाईच्या कामात भाग घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी बोलताना रेमो डिसोझा म्हणाले की, सगळ्या गोष्टींना पर्याय आहे, मात्र पृथ्वीला पर्याय नाही. त्यामुळे ती सुरक्षित राहील याकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे.
असिफ भामला यांनीही यावेळी मिरामारच्या साफसफाईच्या कामात लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी बोलताना केले.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
या मोहिमेत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, आदीही मान्यवर सहभागी होणार आहेत. सागरी जीवांचे संरक्षण करण्यासाठी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.
अनुराग ठाकूर यांचाही सहभाग
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हेही आज मिरामार किनार्याच्या साफसफाईच्या कामात सहभागी होणार आहेत. अमृता फडणवीस, रेमो डिसोझा, जॅकी श्रॉफ, असिफ भामला, कवन कुंद्रा आदी मंडळीही मिरामार किनार्यावरील कचरा उचलून या किनारपट्टीची साफसफाई करण्याच्या कामात सहभागी होणार आहेत.