भाभासुमंला अजूनही मगोची प्रतीक्षा

0
90

>> युती तोडण्यास ३० पर्यंत मुदत

 

ग्रजी प्राथमिक शाळांचे अनुदान रद्द करण्याचे मगोने स्पष्ट आश्‍वासन दिल्यास त्यांच्या पक्षाच्या जाहिरनाम्यातील इतर कार्यक्रमांकडे सद्यस्थितीत दुर्लक्ष करून मगोला निवडणुकीत पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या बैठकीत काल घेण्यात आला. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत २ ऑक्टोबरपर्यंत जनेतला राजकीय पर्याय देण्याचाही निर्णय घेतल्याची माहिती मंचचे नेते ऍड्. उदय भेंब्रे यांनी दिली.
भाजपचा पराभव हा मंचाचा प्रमुख हेतू आहे. मंचाला गोवा प्रजा पार्टी व शिवसेना यांनी सक्रीय पाठिंबा देण्याचे आश्‍वासन दिले आहे. निवडणुकीत उमेदवार उभे करून व गरज तेथे अन्य पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन भाजपचा पराभव करण्यासाठी झटण्याचा निर्णय घेतल्याचे भेंब्रे यांनी सांगितले.
आजपासून मंच निवडणुकीच्या कामासाठी सक्रीय होणार असून राज्यातील महिला शक्ती संघटित करण्यासाठी महिलांचे मेळावे घेण्याची जबाबदारी ऍड्. स्वाती केरकर यांच्यावर सोपविली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. संघाचे व भाजपचे वरिष्ठ नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात दडपण येऊनही तत्वासाठी मंच बरोबर एकनिष्ठ राहिलेले नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे व त्यांच्याबरोबर आलेल्या रा. स्व. संघाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करणारा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. हा ठराव ऍड्. उदय भेंब्रे यांनी मांडला व सर्व कार्यकर्त्यांनी त्याला पाठिंबा दिला.
पक्ष घटनेवर चर्चा घटनेच्या मसुद्याला मंजुरी
मंचातर्फे स्थापन करण्यात येणार्‍या पक्षाच्या घटनेच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली. या मसुद्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली. पक्षाचे नाव निश्‍चित करून त्याची निवडणूक आयुक्तांच्या दप्तरी नोंदणी करण्याचा अधिकार ऍड्. हृदयनाथ शिरोडकर यांना दिल्याचे ऍड्. भेंब्रे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार मंचाने पक्षासाठी काही नावे निवडली होती. परंतु त्या नावांची देशात नोंदणी असल्याने काल पक्षाचे नाव निश्‍चित करणे शक्य झाले नाही. मगोने मंचाला अभिप्रेत असलेले आश्‍वासन दिले तरी पक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया चालूच राहील, असेही सांगण्यात आले. दि. ३० सप्टेंबरपर्यंत मगोच्या निर्णयाची वाट पाहाण्याचे ठरविले आहे.