भाडेकरूंची माहिती न दिल्या घरमालकांवर कारवाई : मुख्यमंत्री

0
22

>> गुन्हे टाळण्यासाठी भाडेकरू पडताळणीच्या पोलिसांना सूचना

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी भाडेकरूंची पडताळणी करण्यावर भर देण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे. तसेच पोलिसांना भाडेकरूंची माहिती न देणार्‍या घरमालकांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची सूचना केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यातील वाढत्या चोर्‍या व इतर गुन्हेगारी प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने भाडेकरूंची पडताळणी करण्याचे काम सुरू केले आहे. राज्यातील गुन्हेगारी प्रकरणामध्ये परराज्यातील व्यक्ती गुंतल्याचे आढळून येत आहे. घरमालकांकडून भाड्याने राहणार्‍या व्यक्तीची माहिती पोलीस यंत्रणेला दिली जात नाही. त्यामुळे तपासात अडथळे येत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पोलिसांना भाडेकरूंची माहिती दिल्यानंतर त्या माहितीची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. घरमालकाने आपल्या घरात भाडेकरू ठेवल्यानंतर त्याबाबत संबंधित पोलीस स्थानकाला माहिती दिली पाहिजे. पडताळणीमध्ये भाडेकरूंबाबत संशय आल्यास वेळीच कारवाई केली जाऊ शकते. भाडेकरूंची पोलिसांना माहिती न देणार्‍या घरमालकांवर कायद्यानुसार दंडात्मक व इतर प्रकारची कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.