पणजीतील आझाद मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात तृणमूल कॉंग्रेस पक्षाने राज्यातील भाजप सरकारवर जनतेचे काय आरोप आहेत, त्याची माहिती देणारे एक आरोपपत्रच काल सादर केले. यावेळी तृणमूल कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझिन फालेरो, तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा व तृणमूलचे नेते बाबूल सुप्रियो उपस्थित होते.
तीन केंद्रीय प्रकल्पांमुळे राज्याचा निसर्ग व पर्यावरणाचा सरकारने कसा विध्वंस चालवला आहे, याचा या आरोपपत्रात उल्लेख आहेच. त्याशिवाय बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी व महिलांवर होणारे अत्याचार, बंद पडलेला खाण उद्योग व तो सुरू करण्याबाबत देण्यात येणारी खोटी आश्वासने, राज्यातील रस्त्यांवर खड्डे पडून झालेली रस्त्यांची दुर्दशा, राज्य सरकारने कर्नाटक राज्याच्या घशात घातलेली गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदी, खर्या भूमिपुत्रांवर अन्याय करणारे सरकारचे भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक, कोविडच्या दुसर्या लाटेच्यावेळी प्राणवायू पुरवण्यात सरकारला आलेले अपयश आणि झालेले मृत्यू आदी कित्येक विषयांना तृणमूलने या आरोपपत्रातून वाचा फोडली आहे.
यावेळी बोलताना बाबूल सुप्रियो म्हणाले की, केंद्रात तसेच गोव्यातही भाजपचे नेते आपले सरकार हे ‘डबल इंजिन’चे आहे, असा दावा करतात; मात्र हे डबल इंजिनचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी तृणमूल कॉंग्रेसला पणजीतील आझाद मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यास परवानगी दिलेली असताना, नंतर ती अचानकपणे मागे घेण्यात आली. यावरून भाजप सरकार राज्यातील जनतेचा आवाज दाबू पाहत आहे, हे स्पष्ट होत असल्याचा आरोप देखील लुईझिन फालेरो यांनी काल केला.