भारतीय जनता पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड डिसेंबर २०१९ च्या अखेरीस केली जाणार आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू असली तरी केंद्रीय निरीक्षकांकडून प्रदेशाध्यक्षांची निवड बिनविरोध केली जाणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश निवडणूक समितीचे प्रमुख तथा सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
राज्यात भाजपची मतदार व जिल्हा पातळीवरील पक्षीय निवडणूक प्रक्रिया येत्या १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. उत्तर गोव्यातील दहा आणि दक्षिण गोव्यातील अकरा मतदारसंघातील समित्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातील शिल्लक नऊपैकी सात मतदारसंघातील निवडणूक येत्या १२-१३ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
तर उत्तर गोव्यातील दहा मतदारसंघातील निवडणूक १४-१५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे, असे तानावडे यांनी सांगितले.
मतदारसंघ समित्यांची निवड झाल्यानंतर उत्तर आणि दक्षिण जिल्हा समित्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर राज्य कार्यकारी समितीच्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे, असे तानावडे यांनी सांगितले.