पणजी महानगरपालिका निवडणूक; आत्तापर्यंत 32 उमेदवारी अर्ज दाखल
पणजी महानगरपालिकेच्या 11 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी काल 31 जणांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले. भाजप पुरस्कृत पॅनलच्या सर्व 30 उमेदवारांनी काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. महानगरपालिका निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 32 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजप पुरस्कृत बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलमधील सर्व 30 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज काल दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये महापौर रोहित मोन्सेरात, माजी महापौर विठ्ठल चोपडेकर, उदय मडकईकर, शुभम चोडणकर, माजी उपमहापौर वसंत आगशीकर यांचा समावेश होता. तसेच आम्ही पणजीकर पॅनलचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो (माजी महापौर) यांनीही उमेदवारी अर्ज भरला.
भाजप पुरस्कृत गटाच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री महालक्ष्मी देवस्थानात जाऊन श्रींचे दर्शन व आशीर्वाद घेतले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी भाजपचे सरचिटणीस तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची उपस्थिती होती; पण मंत्री बाबूश मोन्सेरात हे यावेळी अनुपस्थित होते. महापौर रोहित मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले.
तसेच, आम्ही पणजीकर गटाचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आम्ही पणजीकर पॅनलच्या इतर उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयारी ठेवली आहे.
नियोजनबद्ध प्रचार
करणार : कुंकळ्येकर
भाजप पुरस्कृत आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांनी एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, निवडणूक प्रचाराला नियोजनबद्धरित्या सुरुवात करणार आहोत. पणजीतील मतदारांकडून भाजप पॅनलच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पणजीत सुज्ञ मतदार चांगल्या उमेदवारांची निवड करतील. मागील पाच वर्षांत पणजी महानगरपालिका क्षेत्रात विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारांकडून भाजप पुरस्कृत पॅनलला चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास महापौर रोहित मोन्सेरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.