>> मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याकडून स्पष्ट
१९९९ पासून मगो पक्षाने भाजपला पाठिंबा दिलेला असताना सुद्धा या पक्षाने सदैव आमच्यावर अन्याय केला. तीन वेळा राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला तो केवळ स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच प्रामाणिकपणामुळे. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडीत पुन्हा भाजपला पाठिंबा देणे म्हणजे एका प्रकारे आत्महत्या असल्याचे काल मुंबईहून आल्यानंतर दाबोळी विमानतळावर मगो पक्षाचे नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगतले.
राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्याने अनेक पक्षांनी मतदारांच्या गाठीभेटींबरोबर राष्ट्रीय प्रादेशिक पक्षाबरोबर युतीची बोलणी सुरू केली आहे. आमदार ढवळीकर यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत युती करणार की नाही याविषयी माहिती देताना पर्रीकर यांच्यासाठी मगोने पाठिंबा दिला होता. आज पर्रीकर हयात नाहीत, पण भाजपचे विद्यमान खजिनदार संजीव देसाई आहे. कारण पर्रीकर व देसाई यांच्या उपस्थितीत मगो पक्षाने भाजपला पाठिंबा दिला होता. पण भाजपने सदैव आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्हाला धोका दिला असल्याची टीका ढवळीकर यांनी करताना या परिस्थितीत भाजपशी युती करणे म्हणजे आत्महत्याच ठरेल असे म्हटले.
पुढील वर्षी गोव्यात येणारे विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष १२ शिक्षित युवकांना उमेदवारी देणार आहे. यात डॉक्टर, अभियंते असून त्यांना गोव्यातील जनता अवश्य कौल देणार असल्याचा दावा यावेळी ढवळीकर यांनी केला. पक्षाने गोव्यात १७ वर्षे राज्य करून सामान्य जनतेला जगण्याचा हक्क प्रदान केला असल्याने गोव्यात मगो पक्षाला यश अवश्य प्राप्त होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत
युती नाहीच : दीपक ढवळीकर
>> प्रियोळमध्ये प्रचारास सुरूवात
येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष १२ ते १८ जागा लढवणार असून त्यापैकी १२ मतदारसंघांत पक्षाने यापूर्वीच प्रचाराचे काम सुरू केले आहे. मगो पक्ष कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर युती करणार नाही. मात्र, मगो पक्ष अन्य कुणाबरोबरही युती करणार नाही असा अर्थ मात्र कुणी काढू नये असे काल पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले. आपल्या प्रियोळ मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडल्याच्या पार्श्वभूमीवर दै. नवप्रभाशी श्री. ढवळीकर बोलत होते.
मगो पक्षाने १२ मतदारसंघांत यापूर्वीच काम सुरू केले असल्याची माहितीही ढवळीकर यांनी यावेळी दिली. जर मगो पक्षाने एखाद्या समविचारी पक्षाशी अथवा पक्षांशी युती केली तर पक्ष १२ जागांवर निवडणूक लढवेल. आणि जर युती झाली नाही तर पक्ष सुमारे १८ मतदारसंघांतून निवडणूक लढवेल. काही मतदारसंघांतून पक्षाचे उमेदवारही ठरले असल्याचे ढवळीकर म्हणाले.
भाजपने मगोचा विश्वासघात केलेला आहे. त्यामुळे त्या पक्षाबरोबर मगो कोणत्याही परिस्थितीत युती करणार नसल्याचे ते म्हणाले. आपण येती विधानसभा निवडणूक प्रियोळ मतदारसंघातून लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काल रविवारी वेरें वाघुर्मे पंचायत क्षेत्रात प्रचाराचा नारळ फोडल्याचे त्यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
समविचारी पक्षांशी युतीस भाजप तयार
>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रतिपादन
भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय व राज्य हितास प्रथम प्राधान्य देणारा पक्ष आहे. त्यादृष्टीने चांगल्याच लोकांचे राज्य यावे हा हेतू आहे. भाजपच्या विचारांशी जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्याशी युतीबाबत निश्चित विचार करता येईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. या त्यांच्या वक्तव्याने भाजपची मगो पक्षाशी युती होण्याची शक्यता जिवंत ठेवली आहे. मात्र यावेळी डॉ. सावंत यांनी, सुरवातीला मगो पक्षनेत्यांनीच भाजपशी युती तोडली होती. आमच्या पक्षाच्या विरोधात मगो अध्यक्षांनी निवडणूक लढवली असे सांगितले.
साखळी रवींद्र भवनात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. आम्हाला गोव्याचे हित जपायचे आहे. त्यासाठी जे योग्य व समविचारी असतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही चर्चा करू असे मुख्यमंत्री म्हणाले. समविचारी पक्षाशी युतीसाठी आम्ही निश्चित चर्चा करण्यास तयार आहोत. देश व राज्याचे हित जपणार्या लोकांशी आम्ही निश्चित चर्चा करून युतीच्या दृष्टीने पर्याय ठेवू. मात्र अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
शांतादुर्गेची तुलना
व्यक्तीची नको
देवी श्री शांतदुर्गेची तुलना एखाद्या व्यक्तीशी करणे हा प्रकार गैर आहे. असल्या लोकांना जनता माफ करणार नाही. जनता असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. अशा नेत्यांना जनताच धडा शिकवेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. गोवा हे धार्मिक सलोखा राखणारे राज्य आहे. सर्व धर्मीय या ठिकाणी गुण्यगोविंदाने राहतात. पोर्तुगीज काळातही हा धार्मिक सलोखा नीट होता. आज गोव्यात अराष्ट्रीय वृत्ती येत आहेत. त्याला नेते बळी पडत आहेत. त्यांना आवरण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.