फोंडा मतदारसंघाचे आमदार असलेले ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी काल आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आपला कोणताही विचार नसून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे हे वृत्त खोटे व निराधार असल्याचे त्यांनी काल स्पष्ट केले. आपल्या हितशत्रूंनी ही अफवा पसरविली असल्याचे ते काल अनौपचारिकरित्या काही पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
आपणाला जर भाजपमध्ये जायचेच असेल तर आपण जाहीरपणे तसे बोलून नंतरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगून आपण काहीही लपवून ठेवणार नाही, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.
रवी नाईक यांच्या पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बर्याच काळापासून बोलले जात होते. मात्र रवी नाईक यांनी काल त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला.