>> राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत विरोधकांवर टीका
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या एकदिवसीय बैठकीच्या समारोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस तसेच विरोधी पक्षांवर टीका करताना भाजपमध्ये घराणेशाही नसल्याचे सांगितले. कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर प्रसार माध्यमांकडे याची माहिती देताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बोलत होते.
आगामी काळात भाजपची रणनीती बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्व कार्यकर्त्यांना मोठा मंत्र दिला असल्याचे यादव म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचा सेतू बनला पाहिजे. भाजप अजूनही केंद्रात सत्तेत राहण्याचे मोठे कारण म्हणजे भाजप सुरवातीपासून आणि आत्तापर्यंत सामान्यांशी जुळलेला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाल्याचे यादव यांनी सांगितले. भाजप कार्यकर्त्यांना आगामी काळात याच विश्वासाने आणि आपलेपणाच्या भावनेने पुढे जावे असे आवाहनही यावेळी मोदींनी केल्याचे यादव म्हणाले.
उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. यासाठी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना वातावरण निर्मिती तयार करण्याचे आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी काही सूचना दिल्या. भाजप गेल्या ७ वर्षांपासून केंद्रात सत्तेत आहे आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पण भाजपचा उत्कर्ष अद्याप येणं बाकी आहे, असे नड्डा म्हणाले.