भाजपच्या मंत्री, आमदारांनी आमच्यासोबत यावे ः वेलिंगकर

0
92

>> अंतरात्म्याला जागून निर्णय घ्यावा

 

संघपरिवारातील विद्यमान घडामोडींचा सत्ताधारी भाजपमध्ये परिणाम होण्याची शक्यता असून आपल्या सरकारच्या चुकीच्या निर्णयाची जाणीव त्यांना झालेली असेल तर भाजपच्या मंत्री व आमदारांनी पक्षाची साथ सोडून आमच्यासोबत यावे अशी हाक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिली आहे. ‘गोवा ३६५’ या वृत्तवाहिनीचे संपादक श्री. संदेश प्रभुदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. या मंत्री व आमदारांनी अंतरात्म्याला जागावे व जनतेचा विश्‍वासघात करणार्‍या भाजपची साथ सोडावी असे ते म्हणाले. त्यांनी ते केले नाही तर येणार्‍या निवडणुकीत त्यांना जनक्षोभाला सामोरे जावेच लागेल असा इशाराही वेलिंगकर यांनी दिला.
माध्यम प्रश्नावर जनतेची फसवणूक करणार्‍या विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून फरपट करून न घेता मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा व सत्याच्या बाजूने उभे राहावे असे आवाहनही यावेळी श्री. वेलिंगकर यांनी केले. पार्सेकर निर्णय घेण्यास स्वतंत्र असते तर त्यांनी इंग्रजी प्राथमिक शाळांचे अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला असता असेही श्री. वेलिंगकर यांनी सांगितले.
नवा राजकीय पक्ष स्थापन करणे हा भारतीय भाषा सुरक्षा मंचासाठी अजूनही शेवटचा पर्याय असून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हाच पहिला पर्याय असेल असे वेलिंगकर म्हणाले. मगोने दिलेल्या मुदतीत भाजपची साथ सोडल्यास नवा पक्ष न काढता भाभासुमं त्यांनाच पाठिंबा देईल असेही वेलिंगकर यांनी सांगितले. सतरा वर्षे राज्य चालवण्याचे सामर्थ्य त्या पक्षात असल्याचे वेलिंगकर म्हणाले. मगोनेही भाजपप्रमाणेच माध्यम प्रश्नी तडजोड केलेली नाही का या प्रश्नावर ते भाजपएवढे तडजोडवादी नव्हेत असा निर्वाळा वेलिंगकरांनी दिला. राज्यात आपले तीन लाख मतदार आहेत असा आपला दावा आहे, परंतु दहा लाख मतदारांपैकी तीन लाख म्हणजे केवळ तीस टक्के मतदार आपल्यासोबत आहेत, मग पर्यायी सरकार कसे देणार या प्रश्नावर तीन लाख मतदार हे संघाचे आजवर भाजपला मतदान करीत आलेले कमिटेड वोटर असून त्याशिवाय मगोचीही स्वतःची मते असतील असे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.

भाभासुमंला पाठिंबा आंदोलनापुरताच ः लेले
पणजी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोवा प्रांत स्थापन करण्याच्या कल्पनेत आपण सहभागी नसलो तरी भाभासुमंला पाठिंबा असेल या वक्तव्यासंदर्भात रा. स्व. संघाचे नेते रत्नाकर लेले यांना विचारणा केली असता भारतीय भाषा सुरक्षा मंचाला आपला पाठिंबा हा केवळ मातृभाषेसंदर्भात त्यांनी चालवलेल्या आंदोलनापुरताच असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. येणार्‍या निवडणुकीत कोणाला मत द्यायचे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे व रा. स्व. संघ कधीच कोणाला अमूक एका व्यक्तीला मतदान करा असे सांगत नसतो असे लेले म्हणाले.
इंग्रजी प्राथमिक शाळांना सुरू असलेले अनुदान बंद करावे ही मागणी आपण सरकारजवळ करणार का या प्रश्नावर त्यांनी आपण व्यस्त असल्याचे कारण देत उत्तर दिले नाही.

राजकीय प्रक्रियेत लेलेही सामील
पणजी : भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे माध्यम प्रश्नी जे आंदोलन चालले आहे, त्यात राजकीय पर्याय देण्याचा जो निर्णय झाला, त्या संपूर्ण प्रक्रियेत रत्नाकर लेले सामील होते, असे स्पष्टीकरण प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी काल केले. लेलेंनी घेतलेल्या निर्णयाचा सर्वांनाच धक्का बसला आहे. पण माणसाची कसोटी अशाच आधारावर लागत असते असे वेलिंगकर म्हणाले. आम्ही कोणीही संघद्रोह केलेला नाही व तशी आमची भावनाच नव्हती असेही त्यांनी सांगितले. भाभासुमंला पाठिंबा आहे असे लेले म्हणत असतील तर जे सरकार मातृभाषेच्या विषयात दोषी आहे त्याला आपला विरोध आहे का हे त्यांनी खुलेपणाने सांगावे असे आव्हानही वेलिंगकर यांनी दिले. मातृभाषाद्रोही सरकार पाडणे हाच भाभासुमंचा उद्देश आहे व त्याला लेलेंचा पाठिंबा आहे का हे त्यांनी सांगावे असे ते म्हणाले.