भाजपच्या बैठकीवर कोरगाव येथे दगडफेक

0
99

भटवाडी, कोरगाव येथे भाजपची कोपरा बैठक सुरू असताना अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून ती उधळून लावली. ही घटना काल रात्री साडेआठच्या दरम्यान घडली. या बैठकीला उपस्थित असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर सुदैवाने बचावले. दरम्यान, पेडणे मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राजेंद्र आर्लेकर यांनी या हल्ल्यामागे मगोचे उमेदवार बाबू आजगावकर यांच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.

पेडणे तालुक्यातील कार्यकर्त्यांना कोरगाव येथील बैठकीत विनय तेंडूलकर मार्गदर्शन करीत होते. रात्री ८ वाजता भटवाडी येथे पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या अंगणात बैठक सुरू होती. सदर सभा सुरू झाल्यानंतर काही वेळाने मोटारसायकलवरून आलेल्या साताठ अज्ञात व्यक्तींनी काळोखाचा फायदा घेऊन बैठकीच्या दिशेने जोरदार दगडफेक केली. अंदाजे बैठकीपासून शंभर मीटर अंतरावरून ही दगडफेक करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले. १५ ते २० सेंटिमीटर रुंदीचे दगड असून सुदैवाने ते कुणाला न लागल्याचे अनर्थ टळला. या प्रकरणी पेडणे पोलिसात रीतसर तक्रार नोंदवण्यात येणार असल्याचे भाजप मंडळ अध्यक्ष कृष्णा गावडे यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थिती नियंत्रणात आणली. गेल्या १४ रोजी पेडणे मामलेदार कार्यालयासमोर भाजप – मगो कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती.