>> नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांना वगळले; येडियुरप्पा, सोनोवाल यांना दोन्ही समित्यांत स्थान
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षाचे संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समिती काल जाहीर केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळातून वगळण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे या संसदीय मंडळाचे आणि भाजपच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. सर्बानंद सोनोवाल आणि बी. एस. येडियुरप्पा यांचा दोन्ही समित्यांत समावेश करण्यात आला आहे. संसदीय मंडळ ही भाजपची सर्वात शक्तिशाली संस्था मानली जाते. पक्षाचे सर्व मोठे निर्णय या मंडळाच्या माध्यमातून घेतले जातात.
भाजपचे संसदीय मंडळ हे पक्षाची सर्वात शक्तिशाली संस्था म्हणून ओळखली जाते. राष्ट्रीय स्तरावर किंवा कोणत्याही राज्यात युतीबाबतची चर्चा झाल्यास त्याबाबतचा अंतिम निर्णय संसदीय मंडळाचा असतो. याशिवाय राज्यांमध्ये विधान परिषद किंवा विधानसभेत नेता निवडण्याचे कामही हेच मंडळ करते.
भाजपाच्या संसदीय मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, के. लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, आणि बी. एल. संतोष या नेत्यांचा समावेश आहे.
निवडणूक समिती ही भाजपमधील दुसरी सर्वात शक्तिशाली संस्था म्हणून ओळखली जाते. लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा निर्णय निवडणूक समितीचे सदस्य घेतात. याशिवाय थेट निवडणुकीच्या राजकारणात कोण येणार आणि कोणाला या राजकारणापासून दूर ठेवले जाणार हेही ठरवले जाते. निवडणूक कामकाजाचे सर्व अधिकार पक्षाच्या निवडणूक समितीकडे असतात.
भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यांची यादी देखील जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक समितीचे सदस्य बनवले आहे.
बी. एस. येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव आणि सत्यनारायण जटिया यांना नव्याने ससंदीय मंडळात संधी देण्यात आली आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाची संपूर्ण यादी
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,
गृहमंत्री अमित शहा, बी. एस. येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण,
इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, बी. एल. संतोष (सचिव)
भाजपची केंद्रीय निवडणूक समिती
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,
गृहमंत्री अमित शहा, बी. एस. येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण,
इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथूर, बी. एल. संतोष (सचिव), वनथी श्रीनिवास (पदसिद्ध)