मुदत संपूनही घरे, वाहनांवर अजूनही राष्ट्रीय ध्वज ‘जैसे थे’

0
27

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस राष्ट्रीय ध्वज घर, व्यावसायिक आस्थापने आणि वाहनांवर लावण्यासाठी नागरिकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन होऊन दोन दिवस उलटले तरी अजूनही राष्ट्रीय ध्वज घरे, वाहनांवर लावलेले दिसून येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय ध्वजाचा अवमान टाळण्यासाठी सरकारी यंत्रणेने संबंधितांना राष्ट्रीय ध्वज काढून ठेवण्याची सूचना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आपला राष्ट्रीय ध्वज कायमस्वरूपी लावण्यास कायद्यानुसार मान्यता नाही.

कायद्यानुसार सकाळी लावलेला राष्ट्रीय ध्वज संध्याकाळी उतरवून ठेवला पाहिजे. तथापि, केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय ध्वज तीन दिवस कायमस्वरूपी लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल केला होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रम झाल्यानंतर १६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वज काढून तो सुरक्षित ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते; मात्र अनेक ठिकाणी नागरिकांनी राष्ट्रीय ध्वज काढून ठेवलेला नाही.