पाच नगरपालिका निवडणुकांसाठी नव्याने जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणाला भाजपचे माजी नगरसेवक नव्याने न्यायालयात आव्हान देण्याबाबत विचार करीत असल्याचे काल सूत्रांनी सांगितले. पालिका प्रशासनाने काल जाहीर केलेल्या आरक्षणावर भाजपचे काही माजी नगरसेवक नाराज असून ते या आरक्षणाबाबत न्यायालयात दाद मागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
केपे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दयेश नाईक हे प्रभाग क्रमांक ६ मधून बिनविरोध निवडले गेलेले असून आपली बिनविरोध निवड झाली असल्याचे न्यायालयाने जाहीर करावे या मागणीसाठी आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे नाईक यांनी काल आपल्या समर्थकांशी बोलताना स्पष्ट केले. नाईक यांच्याप्रमाणेच केपे पालिकेवर आणखी दोघा उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे. न्यायालयाने निवडणुकीची प्रक्रिया रद्द करण्यापूर्वी केपे पालिकेवर बाबू कवळेकर यांचा पाठिंबा लाभलेल्या तिघा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती.