– गुरुदास सावळ
गोवा विधानसभा निवडणूक सव्वादोन वर्षांवर असली तरी सत्ताधारी भाजपाने आतापासूनच निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. संरक्षणमंत्रिपदी बढती मिळाल्याने मनोहर पर्रीकर आणि मुख्यमंत्रिपदी बढती मिळाल्याने लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा सत्कार करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत ‘एकला चलो’ची मागणी करण्यात आली. अशीच मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची मान्यता असल्याशिवाय भाजपा कार्यकर्ते कोणतीही मागणी करत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. पर्रीकर आणि पार्सेकर यांच्या सत्कार सोहळ्यात जी मागणी करण्यात आली, त्यालाही भाजपाच्या स्थानिक नेत्यांची मान्यता आहे असे गृहित धरल्यास ते चुकीचे ठरणार नाही.मार्च २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला तब्बल २१ जागा म्हणजे स्पष्ट बहुमत मिळाले. कळंगुट, हळदोणे आणि सांत आंद्रे हे तीन मतदारसंघ भाजपाला मिळतील असे राजकीय तज्ज्ञांनाही वाटले नव्हते. मात्र या तीन जागा भाजपाला मिळाल्या आणि भाजपाचे विधानसभेतील बळ २१ वर गेले. गोव्यातील जनता कॉंग्रेसच्या राजवटीला कंटाळली होती आणि त्यामुळेच भाजपाला २१ जागा मिळाल्या हे भाजपा नेत्यांना मान्य करावेच लागेल. अर्थात या जागा मिळाल्या नसत्या तरी मगोच्या सहकार्याने गोव्यात भाजपाचेच सरकार आले असते. गोव्यातील खाणी बंद असतानाही ज्या पद्धतीने मनोहर पर्रीकर यांनी विविध योजनांचा धडाका लावला, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या दोन्ही जागाही भाजपालाच मिळाल्या. त्यामुळे भाजपा नेत्यांचे मनोबल अधिक वाढले आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत ‘एकला चलो’चा नारा लावला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मगोशी युती करून त्याला सात जागा दिल्या होत्या. त्यांपैकी चार उमेदवार विजयी होतील अशी अपेक्षा होती. मात्र सांताक्रूझच्या मतदारांनी मगोला दगा दिला. बाबुश मोन्सेरात यांच्यापुढे मगोचे भाडोत्री उमेदवार दिनार तारकर यांची डाळ शिजली नाही. भाजपाने मगो पक्षाला सांताक्रूझ किंवा थिवी यांपैकी एक मतदारसंघ निवडण्याचा पर्याय दिला होता. या दोन्ही मतदारसंघांत मगोकडे उमेदवार नव्हता, त्यामुळे मगो नेत्यांनी किरण कांदोळकर यांना मगोतर्फे निवडणूक लढविण्याची विनंती केली. त्यांनी नकार दिल्याने सांताक्रूझ मतदारसंघाची निवड करण्यात आली. २००७ मध्ये पणजीतून मनोहर पर्रीकर यांच्याविरुद्ध सर्व शक्ती पणाला लावून निवडणूक लढविलेले दिनार तारकर यांना मगोने तिकीट दिले. तारकर यांच्यावर भाजपाचा रोष होता. त्यामुळे बर्याच भाजपा कार्यकर्त्यांनी दिनार तारकर यांच्या पारड्यात आपली मते टाकली नाहीत. भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी असहकार केल्याने बाबुशचे फावले. तारकर यांच्याऐवजी अनिल होबळे यांच्यासारख्या स्थानिकाला तिकीट दिले असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. विधानसभा मतदान झाल्यानंतर एक दिवसही दिनार तारकर सांताक्रूझमध्ये दिसले नाहीत. आता पणजी पोटनिवडणुकीत ते कदाचित दिसतील. केवळ निवडणुकीच्यावेळी समाजसेवकाचा आव आणणार्या लोकांना मतदारांनी असाच धडा शिकवला पाहिजे.
दाबोळीचे कॉंग्रेस आमदार मॉविन गुदिन्हो आगामी निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढविणार हे उघड आहे. त्यांनी आताच राजीनामा देऊन भाजपाप्रवेश केला असता. दाबोळीतून मॉविन भाजपातर्फे निवडणूक लढविणार असे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर मगोने या जागेवर आपला दावा केला. त्यामुळे भाजपा सावध झाला असून स्वबळावर निवडणूक लढविण्यावर त्याने विचार चालविला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी चार जागा राखीव असणार हे स्पष्ट आहे. प्रियोळ आणि मडकई हे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्यास ढवळीकरबंधूंना दुसरे मतदारसंघ शोधावे लागतील. सुदिन ढवळीकर फोंड्यात गेले तर विद्यमान आमदार लवू मामलेदार यांची पंचाईत होईल. प्रियोळ राखीव झाल्यास दीपक ढवळीकर गोत्यात येतील. त्यांना नवा मतदारसंघ शोधावा लागेल. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्यांचे सहकार खाते काढून घेतले. त्याबदल्यात दुसरे कुठलेही खाते दिलेले नाही. त्यामुळे दीपक ढवळीकर आधीच नाराज आहेत. सहकारमंत्री म्हणून विविध सोसायट्या, बँका तसेच इतर कार्यक्रमांना ते जात असत. आता त्यांच्याकडे केवळ छपाई हे एकच खाते आहे. त्यामुळे आपल्या मतदारांना ते कोणतीच मदत करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत भाजपाने युती तोडली तर मगोची स्थिती दोलायमान होईल.
मडकई आणि प्रियोळ हे दोन्ही मतदारसंघ कायम राहिले असते तर युती न होताही ढवळीकरबंधू निवडून आले असते. मात्र प्रियोळ मतदारसंघ राखीव होणार हे नक्की असल्याने दीपक ढवळीकर यांना आगामी निवडणूक त्रासदायक ठरणार. त्यांनी कुंभारजुवेतून उमेदवारी अर्ज भरला तरी निवडून येणे कठीण दिसते. युती तुटली तर प्रियोळ आणि मडकई मतदारसंघांवर भाजपा आपले लक्ष केंद्रित करून या दोन्ही मतदारसंघांवर कब्जा मिळवील. युती न झाल्यास मांद्रे आणि पेडणे या दोन्ही मतदारसंघांत आपले उमेदवार उभे करून मगो भाजपाला शह देण्याचा प्रयत्न करील. मात्र लक्ष्मीकांत पार्सेकर आता मुख्यमंत्री बनलेले असल्याने मांद्रे आणि पेडणे मतदारसंघांवर यापुढे भाजपाचे वर्चस्व कायम राहील असे दिसते. पेडणे मतदारसंघात सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी कामांचा सपाटा लावला आहे. त्याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोप विमानतळाचे काम सुरू होणार असल्याने आर्लेकर यांचे आसन कोणी अस्थिर करू शकणार नाही असे दिसते.
‘एकला चलो’चा नारा भाजपाने दिलेला असला तरी सासष्टीत भाजपाची डाळ शिजणार नाही. आवेर्तान फुर्तादो पार्सेकर सरकारात मंत्री असल्याने आगामी निवडणुकीत नावेलीची जागा आवेर्तानसाठी सोडावी लागेल. अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मिकी पाशेको यांना मंत्रिपद मिळाले आहे. अनपेक्षित अशा काही घटना न घडल्या तर गोवा विकास पार्टीची ही युती आगामी निवडणुकीपर्यंत कायम राहील. त्यामुळे नुवे आणि बाणावली हे दोन मतदारसंघ गोवा विकास पार्टीला सोडावे लागतील. कुडतरी व वेळ्ळी मतदारसंघांत भाजपाचे अजून बस्थान बसलेले नाही. त्यामुळे या दोन मतदारसंघांत भाजपाला इतर पक्षाशी किंवा स्थानिक नेत्याशी युती करावी लागेल. वेळ्ळीचे आमदार बेंजामिन सिल्वा भाजपा सरकारला पाठिंबा देत असले तरी आपल्या मतदारसंघात विकासाची कामे करणे त्यांना जमलेले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसविरोधी वातावरण असल्याने बेंजामिन सिल्वा विजयी झाले होते. पण गेल्या पावणेतीन वर्षातील त्यांची कामगिरी फारशी प्रभावी नसल्याने त्यांना परत संधी मिळेल असे वाटत नाही.
फातोर्ड्याचे अपक्ष आमदार विजय सरदेसाई विधानसभा आणि वर्तमानपत्रांतून गाजत असले तरी मतदारसंघात विकास योजना राबविणे त्यांना शक्य झालेले नाही. याउलट माजी आमदार दामू नाईक अधिक कार्यरत आहेत. रवींद्र भवनाचे अध्यक्ष बनल्याने ते सतत जनतेसमोर राहतात. मडगाव मतदारसंघ तर तसा भाजपाचा बालेकिल्ला म्हणायला हरकत नाही. मडगाव मतदारसंघाचा विकास करण्यासाठी दिगंबर कामत धडपडत असले तरी गेल्या पावणेतीन वर्षात त्यांना फारसे यश मिळालेले नाही. गोवा सरकारने खाण घोटाळ्याची चौकशी चालू केली असून दिगंबर कामत व प्रतापसिंह राणे यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याची संधी सरकार सोडणार नाही. निवडणुकीचे नगारे वाजू लागताच खाण घोटाळ्याची चौकशी चालू होईल आणि दिगंबर कामत व प्रतापसिंह राणे यांची नावे आरोपीच्या यादीत येतील. तसे घडले तर मडगावात भाजपाला लाभ होऊ शकेल. मात्र भाजपाकडे सबळ असा उमेदवार आज तरी दिसत नाही.
लुईझिन फालेरो यांनी गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेली असली तरी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करणे त्यांना अजून शक्य झालेले नाही. जॉन फर्नांडिस यांची उचलबांगडी झाल्याने उत्सहित झालेले सगळे आमदार त्यांच्या अधिकारग्रहण सोहळ्यासाठी जमा झाले होते. आता त्यांचा उत्साह मावळला आहे. परत एकदा कॉंग्रेस भवनावर अवकळा पसरली आहे. फालेरो गोवा प्रदेश कॉंग्रेसला नवसंजीवनी देऊ शकतील असे वाटत नाही. विधानसभा निवडणूक आता केवळ सव्वादोन वर्षावर पोचली असून तोपर्यंत प्रदेश कॉंग्रेसला गतवैभव मिळवून देणे कोणाला शक्य होईल असे वाटत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आमदारांची संख्या वाढेल असे वाटत नाही. कॉंग्रेसची ही परिस्थिती भाजपाच्या पथ्यावर पडेल.
भाजपाने मगोबरोबरची युती तोडली तर मगो पक्षाला बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागेल. प्रियोळ राखीव होणार हे निश्चित असल्याने दीपक ढवळीकर यांचे आसन डळमळीत होईल. फोंड्यात भाजपाने पालिका आपल्या ताब्यात ठेवलेली आहे. मगो समर्थक नगरसेवक विरोधी गटात आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार अधिक सामर्थ्यवान असेल. मडकई राखीव न झाल्यास मगो, भाजपा आणि कॉंग्रेस अशी तिरंगी लढत होईल. हिंदुत्ववादी मते मगो व भाजपात विभागली गेल्यास दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ होईल असे दिसते. त्यामुळे युती न झाल्यास मगोवर संकट कोसळू शकते. मगोने गोव्यातील सर्व जागा लढविल्या तरी साखळी व मये मतदारसंघ सोडल्यास इतरत्र मगोकडे बलशाली असे उमेदवार दिसत नाहीत. त्यामुळे युती न झाल्यास मगोची धडगत दिसत नाही.
मनोहर पर्रीकर दिल्लीत गेल्याने आता गोव्याच्या सगळ्या मागण्या मान्य होण्याची चिन्हे दिसत आहेत. गोव्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याची तयारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखविलेली आहे. गोव्याला खास दर्जा, तसेच पोर्तुगीज नागरिकत्व या सगळ्या समस्या आता जलदगतीने सुटतील. पर्रीकर दिल्लीतच असल्याने ते गोव्याच्या मागण्यांचा सतत पाठपुरावा करतील. तसे घडल्यास लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे आसन अधिक बळकट होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला २१ जागा मिळाल्या होत्या. आगामी निवडणुकीत त्याला २५ जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको. मनोहर पर्रीकर दिल्लीला गेल्याने गोव्याचा अधिक लाभ होणार असून त्यामुळेच ‘एकला चलो रे‘ची घोषणा भाजपाने केली आहे.