भटीण आई

0
55
  • गजानन यशवंत देसाई

मला एक प्रश्‍न पडतो, सोवळ्या-ओवळ्यात गुरफटून गेलेल्या त्या काळात भटीण आई कसं काय सगळं सांभाळून घ्यायची? शेवटी ती एक ब्राह्मण स्त्री होती. आजूबाजूला असलेली सर्व कुटुंबे ब्राह्मणेतर. भटीण आई या सर्व विषयांच्या पलीकडे गेली असावी का?

आषाढातील दिवस. रवींद्र भवनात कसल्यातरी कार्यक्रमाच्या गडबडीत होतो. कार्यक्रमाची तयारी सुरू होती. कार्यक्रमाची वेळ झाली आणि कोणीतरी म्हणालं,
‘‘चला, प्रमुख पाहुणे आले, कार्यक्रम सुरू करूया…’’
मी लगबगीने अध्यक्षांच्या केबिनमध्ये डोकावलो. अध्यक्ष आत बसले होते.
मी म्हणालो,
‘‘प्रमुख पाहुणे आले आहेत, कार्यक्रम सुरू करूया.’’
त्यांनी समोर बसलेल्या माणसाला उद्देशून म्हटले,
‘‘चला, मी निघतो हा कार्यक्रम आटोपून, मला लवकर निघायचंय. आमची भटीण काकी वारली.’’
मी सहजच विचारलं,
‘‘कोण भटीण काकी?’’
त्यांनी माझ्याकडं पाहून म्हटलं,
‘‘अरे तुला माहीत नाही? अभ्यंकर, रमाकांतची आई.’’
ऐकले मात्र, मी सुन्न आलो. क्षणभर काय बोलावे ते कळेना.
‘‘कधी?’’
‘‘बहुतेक सकाळीच असावी. आता नऊ वाजलेत, तिथेच हाऊसिंग बोर्डमध्ये आहे.’’
मी मागच्या पावली परत फिरलो. समोरच मला अनिल दिसला. त्याला म्हणालो,
‘‘अनिल, भटीण आई गेली कळालं का तुला?’’
‘‘हो, मला पण आत्ताच कळालं.’’
कार्यक्रमाची जबाबदारी दुसर्‍या कोणाकडे तरी संपवून मी बाहेर आलो. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. गाडी सुरू करून थेट अभ्यंकरांचे घर गाठले. माणसे जमा होत होती. आईचं कलेवर हॉलमध्ये ठेवलं होतं. बाहेर आलो आणि माझ्या घरी फोन करून वार्ता दिली.

मी पहिल्यांदा भटीण आईला पाहिले त्याला जवळ जवळ ४५ वर्षं होऊन गेली असावीत. त्यावेळी मी असेन चार-पाच वर्षांचा. वडिलांची कोठंबीला बदली झाली आणि आम्ही कोठंबीला बिर्‍हाड थाटलं. आमच्या बिर्‍हाडाच्या बाजूलाच भटांचं घर. भटजी काका, भटीण आई, दत्तगुरू दादा, जनार्दन, सुहासिनी, लता, रमाकांत आणि सिंधू असा परिवार. मोठी मुलगी ताई हिचं लग्न आम्ही कोठंबीला येण्याअगोदरच झालेलं… आणि तिला दूर वाळपईला दिलेलं. मोठ्या ताईचा मुलगा एकदोन वर्षांचा असेल. म्हणजे चाळिशीच्या घरात असलेली भटांची आई त्यावेळी आजीसुद्धा झालेली.
नऊवारी कापड नेसणारी, थोडीशी स्थूल, कपाळावर मोठं ठसठशीत कुंकू लावणारी. सुदृढ, गोरीपान अशी भटीण आई त्यावेळी एखाद्या देवीसारखी दिसायची. आमच्या घरात लईराई देवीचा कलशावर स्थापन फोटो होता. कधीतरी हिरवं लुगडं नेसलेली भटीण आई मला प्रति लईराई वाटायची. त्यामानाने भटजी काका बरेचशे कृश वाटायचे. बोलताना सतत धाप लागणारे. सदान्‌कदा कमरेला वाला गुंडळणारे आणि उघडेच वावरणारे भटजी काका थोडेसे तापट वाटायचे. त्यांचा पारा कायम थोडासा चढलेलाच असायचा.

त्याउलट भटांची आई! सदान्‌कदा हसर्‍या मुखाची. बोलताना हसत बोलण्याची लकीब.
आम्ही कोठंबीला जवळजवळ नऊ वर्षे वास्तव्यास होतो. या नऊ वर्षांत भटांच्या आईला रागावलेली मी अभावानेच पाहिले. कुठलाही गंभीर विषय असो, सदान्‌कदा आपली हसत आणि सहज विषय हाताळण्यात वाकबगार. मग तो स्वतःच्या कुटुंबातील असो किंवा गावातील असो.
गावात त्यावेळी पंचांग फक्त भटजींच्या घरी असायचं, जे ओसरीत खुंटीला टांगलेलं असायचं.

साधी पाल जरी अंगावर न पडता जमिनीवर पडली तरी लोक भटजींच्या घरी जायचे. यावेळी त्यांच्या शंकांचं समाधान भटीण आई करायची. घाबरून गेलेले गावकरी भटीण आईचे धीराचे दोन शब्द ऐकल्यावर नि:शंक मनाने परत जायचे ते समाधानाने!
संकष्टीच्या वेळी चंद्रोदय कधी होणार, जेवायचं कधी, या सगळ्या गोष्टी भटीण आई मोठ्या अधिकारवाणीने सांगायची.
भटांच्या घरासमोरील अंगण हे आम्हा मुलांचे हक्काचे छोटेखानी मैदानच असायचे. आयुष्यातला पहिला खेळ वाड्यावरची मुलं या अंगणातच खेळली. कबड्डी, खो-खो, लंगडी, लगोर्‍या. भटजी काका कधीकधी अंगणात खेळणार्‍या आणि दंगामस्ती करणार्‍या मुलांवर खेकसायचे, पण भटीण आई म्हणायची,
‘‘अहो खेळू द्या हो त्यांना. मुलंच ती; दंगामस्ती करणारच. खेळू द्या त्यांना. खेळा रे तुम्ही…’’
१९७२-७३ च्या काळात गावात वीज आली नव्हती. चौगुले कंपनीच्या ऑफिसमधून मंदिरात तेवढी वीज होती. पंचवीस व्होल्टचा एक बल्ब मंदिरात पेटलेला असायचा. मंदिरानंतर वीज आली ती भटांच्या घरी.

गावात विजेचे खांब आले त्यातला एक खांब भटजींच्या अंगणात आला आणि विजेचा बल्ब भटजींच्या अंगणात प्रकाश करता झाला. त्यानंतर काळोख पडल्यावर आपापल्या घरात असणार्‍या मुलांचे खेळ पुढे आठ वाजेपर्यंत भटजींच्या अंगणात सुरू झाले.
भटांच्या घरी एक गाय होती. तांबूस रंगाची. तिचं नावही छान होतं तिला साजेसंच ‘तांबू.’ भटीण आईने ‘तांबूऽऽ’ अशी हाक मारली की ती गाय कान टवकारत हंबरायाची.
गोट्यांनी खेळताना पावसाळ्यात चिखलात हात बुडवल्याने माझ्या हाताना नायटा झाला होता. नायटा नेमका दोन बोटांच्या मध्ये व्हायचा. हातांच्या बोटांना किटाणूंचा संसर्ग होऊन मला धड जेवता येईना की हातात पेन्सिल धरवेना. डॉक्टरांचे औषध, मलम वगैरे सुरू केले पण म्हणावा तसा गुण येईना. एक दिवस भटांची आई म्हणाली,
‘‘भल्या सकाळी ऊठ आणि आमच्या तंबूच्या मुतात हात धू, मग बघ दोन दिसात गुण येतलो.’’
दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे उठून मी त्यांच्या गोठ्यात गेलो आणि वाट बघत बसलो. तांबू गोठ्यात बसून होती. भटांच्या आईने गोठ्यात येत तांबूच्या पाठीवर हलकासा हात ठेवला आणि म्हणाली,
‘‘तांबू, उठ झट्‌दिशी.’’
तांबू उठली आणि मूत्रविसर्जन करू लागली. मी हात पुढे केले आणि त्यात उष्ण गोमूत्राने हात चांगले धुऊन घेतले. भटीण आई बाजूलाच होती. तिने गोमूत्र एका पेल्यात भरून घेतलं आणि आढेवेढे घेणार्‍या मला दोन चमचे पाजलंसुद्धा. रामदेव बाबा गोमूत्राचे फायदे आता सांगतात, पण भटीण आईला ते फार पूर्वी ठाऊक होते.
माझ्या धाकट्या भावाच्या जन्माच्या वेळची गोष्ट. एके सकाळी मी जागा झालो. पाहतो तर भटांची आई समोर बसलेली. म्हणाली,
‘‘उठलो? तुझी आई तुका ल्हान बाबू हाडूक गेल्या.’’
आम्हा दोन्ही भावांना चहा-फराळ दिला. आमच्या शाळेची तयारी केली आणि शाळेतसुद्धा पाठवून दिलं. त्या रात्री जेव्हा आईला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, तेव्हा वडील आईसोबत गेले होते. घरी खोलीत आम्ही दोघे भाऊ आणि आम्हाला कुशीत घेऊन झोपली होती भटांची आई.

भटांच्या आईला लहान मुलांचा खूपच लळा होता. वाड्यावरची लहान मुलं त्यांच्याच घरी असायची. शेजारची एखादी माऊली तीन-चार महिन्यांच्या आपल्या मुलाला विश्वासानं भटांच्या आईच्या स्वाधीन करून आपल्या कामात व्यस्त राहायची. ती मुलं कधी हगली-मुतली नसतील? पण तांबूचे शेण होतेच, सारवले की झालं…!
मला बर्‍याच वेळा एक प्रश्‍न पडतो, सोवळ्या-ओवळ्यात गुरफटून गेलेल्या त्या काळात भटीण आई कसं काय सगळं सांभाळून घ्यायची? शेवटी ती एक ब्राह्मण स्त्री होती. आजूबाजूला असलेली सर्व कुटुंबे ब्राह्मणेतर. भटीण आई या सर्व विषयांच्या पलीकडे गेली असावी का? शेजारची एक मुलगी तर त्यांच्याच घरात लहानाची मोठी झाल्याचं मी ऐकलं होतं. त्यांच्याबरोबर राहून पूर्ण शाकाहारी. हे सर्व पाहिलं की वाटतं काय असावं हे माणसा-माणसांतलं नातं? स्वतःच्या आईवडिलांना, स्वतःच्या भावा-बहिणींनाही आपली न मानणारी काही माणसं असताना भटीण आई नेमकी कोण असावी? दुसर्‍याला जीव लावणारी, दुसर्‍यांना आपलं मानणारी!

पावसाळ्यात भटांच्या घरी झोपाळा बांधलेला असायचा आणि वाड्यावरच्या मुलांची त्या झोपाळ्यावर बसायला झोंबाझोंबी उडायची. एका झोपाळ्यावर आम्ही पाच-पाचजण एकाचवेळी झोके घ्यायचो. मध्ये दोघंजण बसायचो, दोन्ही बाजूला दोन उभी. त्यामागे एकटा. भटांची आई हे सर्व कौतुकानं पाहायची. मध्येच एखादं गाणं शिकव, शाळेत शिकलेल्या कविता म्हणून घ्या, पाढे म्हणून घ्या असं चालायचं.

भटांच्या परसात करमलीचं झाड होतं. गावातलं एकमेव करमलीचं झाड! त्या झाडावरची आंबट-गोड करमलं खायला मुलांची गर्दी पडायची. त्यांचा रमाकांत आणि सिंधू ही आमची समवयस्क, त्यामुळे बर्‍याच वेळा आम्ही हमरीतुमरीवर यायचो. पण असा एकही प्रसंग मला आठवत नाही की भटांची आई आपल्या मुलांची बाजू घेऊन आमच्यावर डाफरतेय! उलटपक्षी म्हणायची, ‘लहान मुलं ती… भांडायची आणि लगेच एकही व्हायची. आम्ही मोठ्यांनी त्यांच्या भांडणात लक्ष घालू नये, फक्त त्यांची भांडणं सोडवायची. त्यांच्या भांडणात लक्ष घालून आमची मन आम्ही कलुषित का म्हणून करायची?’ मला आठवतं, वाड्यावरच्या बर्‍याच मुलांची नावंसुद्धा भटीण आईच्या सूचनेवरून ठेवली गेलेली आहेत.
काही वर्षांनंतर आमचं कुटुंब कोठंबी सोडून वेळगेला स्थलांतरित झालं, पण भटांच्या आईचा जिव्हाळा काही कमी झाला नाही. कोठंबीला गेलो की भटांच्या आईला जाऊन भेटायचं. तीसुद्धा आपुलकीने वागायची. हा येण्या-जाण्याचा सिलसिला हल्लीपर्यंतसुद्धा सुरू होता.

आम्ही साखळीला घर बांधलं. गृहप्रवेश केला तोसुद्धा भट काका आणि भटांची आई यांच्या पौरोहित्याखाली. आमच्या गृहप्रवेशाच्या वेळी भटांच्या आईने एका हंड्यात अनेक प्रकारचे धान्य घालून तो हंडा माझ्या आईच्या हातात देऊन सांगितलं,
‘‘हा धान्याने भरलेला हंडा घेऊन तू तुझ्या नव्या घरात प्रवेश करतेस. आयुष्यात तुला कधीही काहीही उणे पडणार नाही.’’
त्याच दरम्यान मला कळालं की, भटीण आई आणि काका कोठंबी गावचे पौरोहित्य सोडून आणि गाव सोडून आपल्या मूळ गावी आरोशीला जाणार आहेत. आतापर्यंत सर्व मुलांची लग्ने झाली होती. सर्वजण आपापल्या संसारात मग्न होती.
भटीण आई कोठंबी सोडणार ही बातमी कळल्यावर मी लगेच कोठंबी गाठलं. गप्पा मारता मारता म्हणालो, ‘‘भटानआई, (भटांची आई भटानआई) तुम्ही दोघं कोठंबी सोडून जाणार म्हणे, मग हे घर आम्हाला बंद!’’
माझे शब्द ऐकल्यावर भटांची आई क्षणभर गप्पच राहिली आणि नंतर हसून म्हणाली,
‘‘माणसाचं नशीब त्याला जिथे घेऊन जाणार तिथेच त्याला जावे लागणार… आम्ही ठरवणारे कोण?’’
हे बोलताना भटीण आईच्या डोळ्यांत असलेले उदास भाव काही लपले नाहीत. काही वेळाने मी निरोप घेतला. मोटरसायकल अंगणाच्या बाहेर रस्त्यावर ठेवली होती. मोटरसायकलवर बसलो आणि सुरू करणार एवढ्यात मला भटांच्या आईची हाक ऐकू आली. ती मला म्हणाली,
‘‘बाबी, मी कुठंही जाणार नाही. इथंच राहणार तुमच्याबरोबर.’’
मी ऐकलं व हसत हात हलवला. अभ्यंकर कुटुंबाने कोठंबी सोडली. सर्व मुलं इकडे गोव्यातच स्थायिक होती. भटीण आई आणि भट काका दोघं तिकडे आरोशीला गेली. अट्टाहास होता भट काकांचा. आपल्या मूळगावी जायचा. पण भटीण आईचं मन तिकडे दूर रमेना. तिचं माहेर गोव्यातलंच. ती परत परत गोव्यात मुलांकडं येऊ लागली.
वार्धक्यामुळे निसर्ग आपले कार्य करत होता. भटांच्या आईला ऐकू येणं जवळ जवळ बंद झालं. भट काका तर कुणाला ओळखतही नव्हते. मोठा कीर्तनकार दत्तगुरू दादा, त्याने साखळीत गृहनिर्माण वसाहतीतच घर बांधलं.

…आणि त्यादिवशी आईने या जगाचा निरोप घेतला. एक-एक पाहुणा, नातेवाईक येत होते. भटीण आईच्या सुना, नातवंडे, मुली सर्वजण पोचले. आणि एक कार गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून एक तिशीतील महिला खाली उतरली आणि तिने मोठ्याने हंबरडा फोडला. त्या हंबरड्याने उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. मला वाटलं असेल कोणीतरी नातेवाईक. मी बाजूला उभ्या असलेल्या अनिलला विचारलं,
‘‘ही कोण?’’
त्याने मला सांगितल्यावर नकळत माझ्या डोळ्यांत अश्रू दाटले. ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून भटांच्या आईची मानसकन्या होती. हो तीच ती, त्यांच्याच घरी लहानाची मोठी झालेली त्यांच्यापैकीच एक झालेली. मला एक प्रश्‍न पडला, काय नातं असतं माणसामाणसांत? म्हटलं तर खूप काही, म्हटलं तर काहीच नाही. जीवनाच्या प्रवासात माणसांनी नातीच तर जपायची असतात! भटीण आईने नेमकी तीच जपली होती, म्हणून तर रक्ताचा संबंधसुद्धा नसलेली ती मुलगी भटांच्या आईच्या जाण्याने ओक्साबोक्सी रडत होती. बाहेर पाऊस झिरपत होता. पुढची तयारी सुरू होती. त्या वातावरणात मला कवी ग्रेस यांच्या त्या पंक्ती आठवल्या-
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे, तो सूर्य सोडवीत होता…