भटवाडी – नानोडा येथे चिरेखाणीत युवक बुडाला

0
3

भटवाडी नानोडा येथील चिरेखाणीत सांतिनेज पणजी येथील मोहित कश्यप हा 17 वर्षीय युवक बुडून मरण पावला तर अन्य दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. डिचोली अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या दरम्यान काही युवक पाण्याने भरलेल्या सदर चिरेखाणीत स्नान करत असताना तिघेजण बुडत होते. त्यावेळी दोघांना वाचवण्यात यश आले, मात्र मोहित युवक पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळतात डिचोली अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले तत्पूर्वी मोहितला स्थानिकांनी बाहेर काढले होते. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी बुडालेल्या मोहित कश्यपला 108 रुग्णवाहिकेद्वारे इस्पितळात दाखल केले, परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.

सदर युवक पणजी येथून आले होते. बुडालेल्या मोहित कश्यप हा सांतीनेज पणजी येथील असल्याची माहिती देण्यात आली. डिचोली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, दक्षिण गोव्याचे जिल्हा न्यायदंडाधिकारी अश्विन चंद्रा (आयएएस) यांनी एका आदेशाद्वारे धबधबे, वापरात नसलेल्या खाणी, नद्या, तलाव आदीत पोहण्यासाठी उतरणे हे धोक्याचे असल्याचे स्पष्ट करून पोहण्यासाठी त्यांच्या वापरावर एका आदेशाद्वारे बंदी घातली आहे.
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना अशा प्रकारे युवकांनी जीव गमावण्याचे प्रकार वाढत चालले असून हा चिंतेचा विषय असल्याचे सांगितले. युवकांनी तसेच लोकांनी पाण्यात जाताना सर्व ती खबरदारी घ्यावी तसेच खोल पाण्यात उतरू नये अशा प्रकारची विनवणी आमदार डॉ. शेट्ये यांनी केली आहे.