भग्नशिल्पे

0
209

– सौ. पौर्णिमा केरकर

माणसांचे असे मनापासून सख्य जुळले की अनोळखी प्रदेशात जाण्याची भीती नाही वाटत. त्या-त्या माणसांमुळे तो-तो प्रदेश आपला वाटतो. सतत आठवत राहतो… मला वाटते मंदिराचे भग्न खांब, तुटलेल्या-फुटलेल्या मूर्ती, विखुरलेले शिलालेख… वैजनाथाला वरण्यासाठी तयार असलेल्या जोगाईची स्वप्ने अशीच भग्न झाली असतील का?

‘‘या ताई इकडं या, हे बगा इथं आमचे तैत्तीस कोटी देव आपल्या कुटुंबाला घेऊन आले होते वैजनाथ आणि जोगाईच्या लग्नाला. म्हुर्त चुकला की वो लग्नाचा, आनि समद्यांनी हिथंच गाढून घेतलंय स्वतःला. बगा बगा किती दागदागिने अंगावर घातले आहेत ते! आणि ही बगा नर्तकी कशी आरशात बघून मिरविते ती… आणि हा आहे ना तो पार्वतीचा पाय. बोटं बगा किती सुंदर कोरली आहे ती, आणि तिच्या पायातली जोडवी तर खूपच सुंदर. बगा ताई, सगळेच कसे नटलेले आहेत. आवं ताई, देवांना एवढी हौस नटण्याची, मग आम्हा माणसांना का नको?’’ असे म्हणून डोकीवरून घेतलेला पदर नाकावर धरत परिमला सातपुतेबाई हसत होत्या.

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हा सांस्कृतिक- सामाजिक- साहित्यिक- ऐतिहासिक समृद्धी असलेला गाव. अशा या गावाची श्रीमंत स्थळे अनुभवण्याचा योग अलीकडेच आला. अगदी काही वर्षांपूर्वीच या परिसरात बाराखांबी मंदिराचे उत्खनन झाले आणि या गावच्या ऐतिहासिक संचितात आणखीनच भर पडली. ज्यांच्या मालकीची ही जागा, किंबहुना जे कुटुंब या जागेत शेती करीत होते ते सातपुते कुंटुंबीय. याच कुटुंबाच्या या परिमलाबाई. हे मंदिर पाहण्यासाठी येणार्‍या अभ्यासकांना, संशोधकांना, पर्यटकांना स्वतःच्या परीने माहिती देण्याचा प्रयत्न ती करीत असते.

आम्ही ज्यावेळी या मंदिर परिसरात प्रवेश केला तेव्हा अस्ताला जाणार्‍या सूर्याची किरणेसुद्धा आमच्या सोबतीला होती. ओसाड माळरानाचा हा प्रदेश एकेकाळी नैसर्गिक साधनसंपत्तीने पुरेपूर भरलेला होता याची साक्ष इथल्या खाणाखुणा देत होत्या. परंतु मानवी हव्यासाचा अतिरेकच एवढा की भग्न बाराखांबी मंदिराच्या अवतीभवती विखुरलेले अवशेष पाहता मनाला वेदना झाल्याशिवाय राहत नाहीत. त्या अस्ताव्यस्त खुणांवरील धूळ हाताने, फुंक मारून तर कधी पदराने पुसत परिमलाबाई आम्हाला त्या शिल्पांविषयी माहिती पुरवित होत्या. मला तिच्या त्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाचे फार कौतुक वाटले. तिला त्यासंदर्भात विचारलेसुद्धा, ‘‘तुमचं शिक्षण काय झालं? आणि हा इतिहास तुम्हाला कसा माहीत?’’ त्यावर त्या हसून म्हणाल्या, ‘‘आवं ताई, मी इथलीच ना! मंदिर सापडलं बगा ती जमीन आमचीच. मोदींच्या स्वच्छता अभियानाची मोहीम चालू होती, त्यात सापडले बगा हे मंदिर. अभ्यास करणारी मंडळी येतात, ती बोलतात, पुरातत्त्व खात्याची लोकं येतात ती काहीबाही सांगतात. मी बी सारं ऐकून घेते. आता तोंडपाठ झालंय. तुमी म्हनाल तर मी अजिबात शिकले नाय. पन ताई, अणभव माणसाला शिकवतोच की… आता ती बगा…’’ पलीकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, ‘‘त्या तिथे सीतेची न्हाणी हाय. आपली सीता वो रामाची. वनवासात असताना हिथंच राहायची. तिला बी वैजनाथ जोगाईच्या लग्नाला जायचं होतं, पन र्‍हाऊनच गेलं की…’’ तिचं बोलणं ऐकत राहावंसं वाटत होतं खरं. तिन्हीसांजा होत होत्या. माझं मन मात्र तिने सुुरुवातीलाच सांगितलेल्या जोगाई-वैजनाथाच्या लग्नाच्या गोष्टीतच अडकून राहिलं. म्हणून मग तिला विचारलंच लग्नासंदर्भात.

अंबाजोगाईपासून परळी वैजनाथ हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक जोर्तिलिंग, तेवीस कि.मी.च्या अंतरावर वसलेलं. अंबाजोगाई हे शक्तिपीठ कोकणातल्या ब्राह्मणांचे भक्तिस्थान. मुख्य मंदिरात भक्तांची वर्दळ नेहमीचीच. मूळ माया जोगाई ही जयंती नदी ओलांडून डोंगरावर अजूनही वैजनाथाची वाट पाहत स्थिरावलेली आहे असे भक्तगण, लोकमानस मानीत आलेले आहे. परळीचा वैजनाथ हे भगवान शंकराचे रूप तर जोगाई पार्वती. त्यांचे लग्न व्हायचे होते. त्या लग्नासाठी म्हणे तैत्तीस कोटी देव आपल्या कुटुंबासहित आले होते. परंतु लग्नाचा मुहूर्त मात्र टळून गेला. उजाडण्यापूर्वी लग्न व्हायला हवं होतं, पण तसं घडलं नाही. वैजनाथ लग्न न करताच परळीला निघून गेले. जोगाई आजही डोंगरमाथ्यावर त्याची वाट पाहत बसलेली आहे. ज्या देवदेवता लग्नासाठी आलेल्या होत्या, त्यांनी स्वतःला गाडून घेतले अशी आख्यायिका लोकमनात दृढ आहे.

उत्खननात सापडलेले शेकडोंच्या संख्येने असलेले भग्नावशेष बारकाईने पाहिले असता तिथे जणू काही एखादा उत्सवच चालू होता असा भास झाल्याशिवाय राहत नाही. दर्पणसुंदरी, गळ्यात आंब्याची माळ घालून दिलखेचक अदा करून असलेली ललना, भगवान शंकरालासुद्धा टाचाखाली धरून राहिलेली महाकाली, स्वतःच्याच विश्‍वात रत झालेल्या नर्तकी, ललना… गळ्यात-हातापायांत दागदागिने घालून मिरविणारे हे राखीव, रेखीव, कातीव शिल्पकाम, खांबाखांबांवर केलेले कोरीवकाम हे सगळे अनुभवता लोकमनाने लावलेला जोगाई-वैजनाथ लग्नाचा अर्थ आणि तिथे उपस्थित राहण्यासाठी आलेल्या देवदेवतांचा महाकाय समूह, या सार्‍यांची संगती विज्ञानयुगात लावत असताना त्यात सुसंगत असे काही जाणवत नसेलही, परंतु ज्या देवतत्त्वाविषयी मनात अपार श्रद्धा आहे त्यासंदर्भात त्यांचे मानवीकरण करीत त्यांचे चमत्कार, त्यांचे खाजगी जीवन याविषयीची कल्पना करणे सतत चालूच राहते.

परिमलाबाईंना अक्षरओळख नाही. शेती हेच उपजीविकेचे साधन. आता बाराखांबी मंदिर आणि तिथे गाडल्या गेलेल्या असंख्य मूर्ती, खांबांवरचे कोरीवकामाचे भग्न अवशेष, शिलालेख, तळी हे सर्वच त्यांच्या शेतजमिनीत येत असल्याने, या सांस्कृतिक खजिन्यामुळे यावर आता पुरातत्त्व खात्याचे बारकाईने लक्ष आहे. त्या जागेत शेती करणे आता शक्य नाही. निदान आपल्या मुलांना तरी नोकरी मिळावी ही त्यांची माफक इच्छा आहे. मंदिर बघायला येणार्‍या लोकांची वर्दळ वाढलेली आहे. ऐकून ऐकून बर्‍याच गोष्टी त्यांना पाठ झालेल्या आहेत. त्यात आपण तयार केलेल्या दंतकथांचा भरणा… येणारे-जाणारे शंभर-पाचशे रुपये तिला देतात तेवढीच कमाई होते. लोकांनासुद्धा या एवढ्या अनोळखी प्रदेशात हसतमुख, नितळ चेहर्‍याची परिमला डोक्यावर पदर घेत कोणी काही विचारण्यापूर्वीच मंदिराविषयीची माहिती द्यायला सुरुवात करते. गाभार्‍यात नेऊन तीर्थप्रसाद देते. संपूर्ण मंदिर फिरविते. स्वतःला माहिती असो-नसो, पण आत्मविश्‍वासपूर्वक मंदिरावरील भग्नावशेषांची भरपूर माहिती देते. तिला भावतात ते त्या ललनांच्या अंगावरील दागदागिन्यांचे कोरीवकाम, मोडून पडलेल्या खांबांवरची नक्षी, शंकर-पार्वतीचे मुखवटे दोन्ही दोन बाजूला दिसतात. ते पाहून ती हळहळते. सहजपणाने जीवन जगातात ही माणसे…

आणि दुसर्‍या बाजूला असंख्य माणसे प्रतिष्ठितपणाच्या आवरणाखाली झगझगाटात, चकचकाटात नेहमीच वावरण्याचा प्रयत्न करतात. कितीही पैसा सोबतीला असला तरीसुद्धा विचारांचे दारिद्य्र पांघरूनच जीवनप्रवास करतात. त्यामुळे नितळ, पारदर्शी जगता येत नाही. परिमलासारखी खूप माणसे संशोधनाच्या माझ्या प्रवासात मला भेटली. ओळख-पाळख नसतानासुद्धा त्या-त्या क्षणी जिवाभावाने एकरूप झाली. आपल्याजवळ असलेली माहिती जशी आहे तशी पुरविली. त्यात इतिहास किती? त्याचे वास्तव काय? या खोलात शिरण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. मलाही त्यामागे त्यांच्या भावनाच महत्त्वाच्या वाटल्या. जगण्यासाठी लोक तर किती आटापिटा करतात. प्रसंगी वाममार्गाने पैसा कमवितात. परिमला तर सरळ मार्गानेच जाताना जे कोणी काही देतात त्यातच धन्यता मानते. त्या तिथल्या निर्जन माळरानावर ती येणार्‍या-जाणार्‍यांची ओळख बनते. बाराखांबी मंदिर, तिथले विखुरलेले अवशेष जसे आठवतात तशीच ही परिमला मला आठवत राहते…

इतिहास, संस्कृती, समाज, माणसे, जागा हा सगळा विराट गुंतागुंतीचा परिघ दोन डोळ्यांनी बघणे, अनुभवणे आणि त्याला शब्दबद्ध करणे ही साधीसोपी गोष्ट मुळीच नाही. इंद्रिय-संवेदनांच्या माध्यमातून आपल्या आत आत खोल कुठेतरी खूप काही कळत जातं. असे असूनही ते अव्यक्तच राहतं. जगावेगळे असे खूप काहीतरी असेल जे बघायचेच राहून जाईल. पण जे काही बघता येते त्यातही प्रतिकात्मक जग दिसून येईल, या आशेवरच भ्रमंती करायची. एखादा नवा प्रदेश, नवी जागा, आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांसकट सामोरी येणारी माणसे… किती अनोळखी? प्रवास सुकर-समाधानी होतो तो याच माणसांमुळे असं मला मनापासून वाटत आलेले आहे. जोगाईची व्रतस्थता अनुभवून परळीला वैजनाथला भेटण्यासाठी जायचे होते. कणेरवाडीच्या सोमनाथ शाळेतील सोमनाथ अजाले नावाचे गृहस्थ सोबतीला आले. दगडू दादामुळे हे शक्य झाले. माणसांचे असे मनापासून सख्य जुळले की अनोळखी प्रदेशात जाण्याची भीती नाही वाटत. त्या-त्या माणसांमुळे तो-तो प्रदेश आपला वाटतो. सतत आठवत राहतो… मला वाटते मंदिराचे भग्न खांब, तुटलेल्या-फुटलेल्या मूर्ती, विखुरलेले शिलालेखा… वैजनाथाला वरण्यासाठी तयार असलेल्या जोगाईची स्वप्ने अशीच भग्न झाली असतील का?