भगीरथ

0
11

नापिक जमिनीवर तीस पस्तीस वर्षे घाम गाळून तेथे हिरवेगार कुळागर फुलवणारे सावईवेरे येथील प्रगतिशील शेतकरी श्री. संजय अनंत पाटील यांची यंदा ‘पद्मश्री’ किताबासाठी झालेली सार्थ निवड गोमंतकीय जनतेसाठी अभिमानास्पद तर आहेच, शिवाय गोमंतकातील तमाम शेतकरी आणि बागायतदारांसाठी ती प्रेरणादायीही आहे. एकीकडे विकासाच्या नावाखाली शेती आणि बागायतींच्या अस्तित्वावर घाला घातला जात असताना आणि राज्यातील शेतकरी आणि बागायतदारांना रोज अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असताना एखाद्या शेतकऱ्याच्या प्रामाणिक कार्याची अशा प्रकारे दखल घेतली जाणे आणि असा राष्ट्रीय सन्मान दिला जाणे ही त्या व्यक्तीपेक्षा त्या किताबाची प्रतिष्ठा वाढवणारी गोष्ट आहे असे आम्ही मानतो. अनेक माणसे पद, पैसा, प्रसिद्धीपासून दूर राहून निरलसपणे आपले काम अविरत करीत असतात. अहोरात्र घाम गाळत असतात. संजय पाटील हेही असेच एक नाव. नापिक गणल्या गेलेल्या जवळजवळ दहा एकर जमिनीवर हिरवे नंदनवन फुलवण्याचा वसा त्यांनी घेतला. पण त्यासाठी सर्वांत आवश्यक गोष्ट म्हणजे पाणी. तिचाच तुटवडा असल्याने मेहनतीने लावलेली रोपे करपून जाण्याचीच शक्यता अधिक. परंतु ह्या डोंगराएवढ्या अडचणीवर मात करीत त्यांनी डोंगरमाथ्यावरून नैसर्गिक झऱ्यांचे पाणी ह्या नापिक जमिनीकडे वळवले. तिला नवसंजीवनी देण्यासाठी अक्षरशः बोगदे खोदून ते पाणी त्या जमिनीत झिरपेल आणि मुरेल हे पाहिले. जमिनीचा कस वाढवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर केला. रासायनिक खतांऐवजी निसर्गशेतीला प्राधान्य दिले. गोमुत्र, शेण, बेसन, गूळ यांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून त्या जीवामृताचे खत झाडापेडांना घातले. एकट्याने अहोरात्र हे कष्ट उपसले, त्यातूनच हे हिरवेगार कुळागर उभे राहिले. कुळागरे ही खरे तर गोव्याचे भूषण. आपल्या वाडवडिलांनी ठिकठिकाणी वसवलेली अशी कुळागरे आज त्यासाठी कष्ट उपसण्यास वेळ नसल्याने उघडीबोडकी बनलेली पाहणे आपल्या नशिबी आले आहे. सरकार एकीकडे स्वयंपूर्णतेच्या बाता करते, परंतु दुसरीकडे सरकारच्याच यंत्रणा केवळ बड्या राजकारण्याच्या भूखंडांचे मोल वाढवण्यासाठी बायपासच्या नावाखाली कुळागरांवर बुलडोझर चालवतानाही दिसते. जलवाहिन्या आणि कालव्यांसाठी तर आजवर असंख्य कुळागरे उद्ध्वस्त केली गेली आहेत. आपल्या राजकीय शत्रूंवर सूड उगवण्यासाठी त्यांच्या कुळागरांवर घाला घालण्यापर्यंतही येथील काही राजकारण्यांची मजल गेली हा तर इतिहास आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एका कष्टाळू शेतकऱ्याचा अशा प्रकारे राष्ट्रीय सन्मान होणे ही गोष्ट खरोखर आनंदाची आणि अतिशय समाधानाची आहे. संजय पाटील यांनी एकट्याने हे कष्ट उपसले. त्यामुळे त्यांना ‘वन मॅन आर्मी’ असेही संबोधले जात आले आहे. निसर्गशेतीचे हे प्रयोग यशस्वी करण्यासाठी त्यांना आयसीएआरमधील कृषितज्ज्ञांचीही महत्त्वाची साथ लाभली. एखाद्या रत्नाची पारख करण्यासाठी तशाच रत्नपारख्याचीही आवश्यकता असते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या कष्टांना साथ देणाऱ्या आयसीएआरमधील तज्ज्ञांचेही यावेळी अभिनंदन केले पाहिजे. त्यांच्याकडून मिळालेल्या तांत्रिक ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीमध्ये अवलंब करून पाटील यांनी ते यशस्वी करून दाखवले. केवळ बारावीपर्यंत शिकलेल्या पाटील यांच्याकडे अनुभवाने आलेले ज्ञान हे अभियंत्यालाही लाजवणारे आहे अशा शब्दांत आयसीएआरने त्यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामनिर्देशित केले होते आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांना तो सन्मान केंद्रीय कृषिराज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या हस्ते प्राप्त झाला होता. संजय पाटील यांचा सन्मान हा प्रातिनिधिक आहे. ‘आपला सन्मान हा गोव्यातील तमाम शेतकऱ्यांचा सन्मान आहे’ अशी नम्र प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. गोव्यात आजही असे अनेक शेतकरी आणि बागायतदार प्रसिद्धीपराङ्मुख राहून दिवसरात्र आपल्या कुळागरात कष्ट उपसत असलेले व तेथे शेतीचे वेगवेगळे प्रयोग करीत असतात. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे उच्चशिक्षित युवकांची संख्याही त्यात लक्षणीय आहे. पदवीनंतर सरकारी नोकरीसाठी राजकारण्यांचे पाय धरण्याऐवजी आपल्या शेती आणि बागायतीमध्ये रस घेऊन जाणीवपूर्वक त्या क्षेत्रात उतरलेल्या आणि मातीतून हिरवे सोने उगवणाऱ्या ह्या तमाम युवकांना संजय पाटील यांच्या ह्या सन्मानाने निश्चितच फार मोठी प्रेरणा दिली असेल. आपल्या सन्मानामुळे राज्यात कृषी संस्कृतीला चालना मिळावी ही त्यांची अपेक्षा पूर्ण होवो!