ब्लास्टर्सविरुद्ध फॉर्म राखण्याचा मुंबईचा निर्धार

0
230

सातव्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शनिवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर मुंबई सिटी एफसीची केरला ब्लास्टर्सविरुद्ध लढत होईल. त्यावेळी फॉर्म कायम राखण्याचा मुंबई सिटीचा निर्धार असेल.
सर्जिओ लॉबेरा यांच्या आगमनानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटीने स्वप्नवत प्रारंभ केला आहे. मागील लढतीनंतर मात्र बारा दिवसांचा ब्रेक आल्यामुळे संघाची लय विस्कळीत झाल्यासारखे लॉबेरा यांना वाटते आहे. लॉबेरा यांनी सांगितले की, स्पर्धात्मक सामन्यांशिवाय साधारण दोन आठवड्यांचा ब्रेक फारच मोठा असतो. अशा परिस्थितीची छाननी करायची झाल्यास तुम्ही जेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये असता तेव्हा असा ब्रेक चांगला नसतो.

खेळत राहणे जास्त चांगले असते. त्याचवेळी दुसरीकडे सरावासाठी जास्त वेळ मिळणे चांगले असते. लॉबेरा यांचा संघ सध्या सात सामन्यांतून १६ गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. ब्लास्टर्सवर विजय मिळाल्यास त्यांना एटीके मोहन बागानकडून आघाडी पुन्हा मिळवता येईल. लॉबेरा यांनी सांगितले की, हे अवघड आहे, पण त्याचवेळी आमच्याकडे सक्षम खेळाडू असल्यामुळे मोठ्या ब्रेकनंतर खेळणे सोपे सुद्धा आहे. मोठा ब्रेक घेऊन तीन दिवसांत दोन सामने खेळण्यास माझी पसंती नसेल. प्रशिक्षक म्हणून लॉबेरा यांना ब्लास्टर्सविरुद्ध एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. पाच विजय आणि एक बरोबरी अशी त्यांची काामगिरी आहे, पण हा मुद्दा वेगळा आहे. शनिवारी सारखी शैली आणि खेळण्याची पद्धत असलेले दोन संघ आमनेसामने येतील. लॉबेरा यांनी सांगितले की, ब्लास्टर्सकडे फार चांगला संघ असल्यामुळे लढत अवघड असेल. त्यांचे प्रशिक्षक उत्तम आहेत. ते आमच्यासारख्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न करतात. एक प्रशिक्षक म्हणून तुम्हाला जिंकण्यासाठी संघाच्या संतुलनावर काम करावे लागते. लॉबेरा यांच्या संघाविरुद्ध फक्त तीन गोल झाले आहेत. याशिवाय संघाचे परिपूर्ण संतुलन साधताना त्यांनी केलेले गोल तब्बल ११ आहेत. ह्युगो बुमूस तंदुरुस्त असून संघासमोर दुखापतीची कोणतीही समस्या नसल्याची माहिती लॉबेरा यांनी दिली.

दरम्यान, गेल्या तीन सामन्यांत ब्लास्टर्सची कामगिरी लक्षणीयरित्या सुधारली आहे. पाचच गोल आणि सामन्यागणिक १२ शॉट अशा कामगिरीनंतर त्यांनी सुधारणा केली. लॉबेरा यांच्याविरुद्ध अपयशाचा अपशकून संपवण्यास प्रशिक्षक किबू व्हिकुना प्रयत्नशील असतील.
व्हिकुना यांनी सांगितले की, मुंबई सिटीचा संघ चांगला असून त्यांच्याकडे फार चांगले खेळाडू आहेत. ते चांगला खेळ करीत आहेत. आयएसएलमधील एक चांगला संघ त्यांचा आहे. आम्ही सराव सत्रांमध्ये खेळात सुधारणा करीत आहोत. ज्या पद्धतीने आम्ही सराव करीत आहोत त्याविषयी आनंदी आहोत.