गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी विभागाने बोरी फोंडा येथील अमलीपदार्थाचे उत्पादन करणारी हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची लागवड (कॅनाबीस) करणाऱ्या प्रयोगशाळेचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणी मुख्य संशयित युवराज बोरकर (31, रा. बोरी) याला अटक केली. पोलिसांनी या छाप्यात अंदाजे 8.50 लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले. संशयिताकडून जप्त केलेल्या अमलीपदार्थामध्ये 150 ग्रॅम हायड्रोपोनिक तण, 1 किलो गांजा आणि 15 ग्रॅम एमडीएमएचा समावेश आहे. युवराज बोरकर हा आंतरराष्ट्रीय वेबसाइटवरून अमलीपदार्थाचे बियाणे आयात करीत होता. तसेच, बोरी-फोंडा येथील राहत्या घरात तळघरात हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची लागवड करीत होता. पोलिसांनी काही सुधारित एलईडी दिवे देखील हस्तगत केले आहेत. गांजा उत्पादनासाठी या एलईडी दिव्याचा वापर केला जात होता, असे अमलीपदार्थ विभागाने केलेल्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे.