बेळगाव जिल्ह्यातील सदलगा (कर्नाटक) येथे पत्नीचा खून करून गोव्यात पळून आलेला दिनेश गणपत पाटील (इंचलकरंजी – कोल्हापूर) याला पणजी पोलिसांनी मिरामार येथे काल संध्याकाळी अटक केली.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथील दिनेश पाटील याने शनिवार ११ ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्ह्यातील सदलगा येथे पत्नी दिशा पाटील हिचा खून करून आपल्या मोटरसायकलने गोव्यात आला. स्थानिक सदलगा पोलिसांना दिशा हिचा मृतदेह आढळून आला. स्थानिक पोलिसांनी दिनेश पाटील याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासकामाला सुरुवात केली.
सदलगा पोलिसांना संशयित दिनेश याचे मोबाईल लोकेशन पणजी परिसरात आढळून आले. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी या खुनाबाबत पणजी पोलिसांना माहिती देऊन संशयित दिनेश याचे मोबाईल लोकेशन पणजीत मिळत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पणजी पोलिसांच्या पथकाने शहरात दिनेश याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
मिरामार येथे दिनेश मोटरसायकलवरून फिरत असल्याचे आढळून आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन याबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उत्क्रांत राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.