काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा ॲटमबॉम्ब फोडण्याची भाषा करीत फोडलेला बॉम्ब पुन्हा एकदा फुसका निघाला. राहुल गांधी निवडणुकांतील आपल्या पक्षाच्या पराभवाचे खापर पुन्हा पुन्हा निवडणूक आयोगावर फोडत आहेत. निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी करून त्याला निवडणुका जिंकून देत आहे असा बेछूट आरोप राहुल पुन्हा पुन्हा करीत आले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर राहुल यांनी काही मतदारसंघांचे दाखले देत प्रश्न उपस्थित केले होते. निवडणूक आयोगाने त्याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले होते, शिवाय महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल यांचे ते दावे किती चुकीची गृहितके मांडणारे आहेत हे दाखवून दिले होते. असे असताना पुन्हा एकदा राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला निशाणा केले आहे. गेल्या सात ऑगस्टला त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे काही ‘पुरावे’ देत निवडणूक आयोग भाजपला मदत करीत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यासाठी त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटकमधील बेंगळुरू मध्य महादेवपुरा लोकसभा मतदारसंघातील मतदारयादीचे विश्लेषण करून हाती लागलेले काही ‘पुरावे’ त्यांनी मांडले. प्रथमदर्शनी पाहता राहुल यांनी दाखवलेल्या गोष्टी गंभीर स्वरूपाच्या होत्या. एकाच मतदाराचे मतदारयादीत अनेकदा वेगवेगळ्या राज्यांत किंवा वेगळ्या बुथवर कसे नाव आहे, अनेक पत्ते कसे अवैध आहेत, एकाच छोट्याशा खोलीत ऐंशी मतदारांची नावे कशी नोंदवलेली आहेत, मतदार छायाचित्रे कशी चुकीची आहेत वगैरे वगैरे गोष्टी त्यांनी विस्तारपूर्वक माध्यमांसमोर मांडल्या. एकट्या महादेवपुरा लोकसभा मतदारसंघात एक लाख दोनशे पन्नास मतदार बोगस असल्याचा राहुल यांचा त्या आधारे दावा होता. त्यांनी हा दावा एवढ्या ठामपणे केला की लोकांचा निवडणूक आयोगावरील विश्वासच उडावा. परंतु ह्या सगळ्या आरोपांची सत्यासत्यता तपासण्यासाठी जेव्हा प्रसारमाध्यमे पुढे झाली, तेव्हा एकेका गोष्टीचा बार फुसकाच निघत असल्याचे दिसून येते आहे. ज्या मतदारांची नावे अन्यत्र असल्याचा दावा राहुल यांनी केला होता, ती तशी नसून मतदार ओळखपत्र क्रमांक देखील समान नसल्याचे स्पष्ट झाले. एकच मतदार महादेवपुरामध्ये, मुंबईत आणि लखनौत मतदार म्हणून नोंद असल्याचा आरोप उत्तर प्रदेशच्या मुख्य निर्वाचन अधिकाऱ्यांनी छाननी करून निकाली काढला. एकाच खोलीच्या पत्त्यावर ऐंशी मतदार नोंदवलेले असल्याच्या विषयात प्रत्यक्षात भाड्याच्या खोलीत राहणारे कष्टकरी मतदार एखाद्या पत्त्यावर मतदार ओळखपत्र बनवून घेतल्यानंतर प्रत्येक वेळी तो पत्ता बदलण्याची तसदी घेत नाहीत एवढेच समोर आले. शिवाय ज्याच्या घराच्या पत्त्यावर हे एवढे मतदार आढळले होते, तो स्वतःच काँग्रेसचा कार्यकर्ता निघाला. निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्या अगदी शंभर टक्के निर्दोष आहेत असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल, परंतु त्या अधिकाधिक निर्दोष करण्यासाठी निवडणूक आयोग अथकपणे कार्यरत असतो हेही तेवढेच खरे आहे. काँग्रेसची देशात सत्ता होती, त्या काळातील निवडणुका आणि आजच्या काळातील निवडणुका ह्यामध्ये पारदर्शकतेच्या बाबतीत जमीन अस्मानाचा फरक पडला आहे हे कोणीही मान्य करील. तेव्हाची ती ‘बुथ कॅप्चरिंग’ची दृष्ये आजही वाचकांना आठवत असतील. आज अधिकाधिक लोकांनी मताधिकार बजावावा ह्यासाठी निवडणूक आयोग करीत असलेले प्रयत्न खरोखरीच कमालीचे आहेत. मतदारयाद्यांचे सतत चाललेले अद्ययावतीकरण, मतदानकेंद्रांची संख्या वाढवण्याचा प्रयास, मतदारांना मतदानासाठी यावेसे वाटावे ह्यासाठी केले जाणारे विविध प्रयत्न ह्या साऱ्यातून मतदानाची उत्तम टक्केवारी अलीकडे देशात दिसत असते. मतदारयाद्या शंभर टक्के निर्दोष असतील असे जरी मानता येत नसले, तरी एखाद दुसऱ्या त्रुटीमुळे, ह्या देशातील कोट्यवधी मतदारांना सहभागी करून घेऊन निवडणुकांचा प्रचंड व्याप यशस्वीपणे राबवणाऱ्या निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर तिच्यावरील विश्वासच उडावा अशा प्रकारे बेछूट आरोप करणे हे राहुल गांधींसारख्या जबाबदार नेत्याला शोभादायक नाही. मतदारयाद्यांतील चुका दुरुस्त व्हाव्यात ही अपेक्षा रास्त आहे, परंतु आयोग जाणूनबुजून हे करीत आहे असे म्हणणे हा अतिरेक आहे. मतदारयाद्या ह्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून दिलेल्या असतात, तेव्हा निवडणुकीपूर्वी त्यातील दोष का शोधले जात नाहीत? निवडणुकांत पराभव झाल्यानंतरच हे ब्रह्मज्ञान का सुचते हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपल्या अपयशाचे खापर निवडणूक आयोगाच्या माथी मारल्याने काँग्रेस पक्षाचा मूळ प्रश्न सुटणार आहे का?