बेकायदेशीर पद्धतीने गोव्यात वास्तव्य करून बेकायदेशीर व्यवसाय करणार्या विदेशी नागरिकांना येथून त्यांच्या देशात पाठविण्यासाठी धोरण तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत आमदार मायकल लोबो यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिले.
वरील प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास वेगळे पथक स्थापन करून कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रश्नावरील सभागृहाच्या भावनाचा निश्चितच विचार होईल. वरील विदेशी नागरिकांची नावे ‘व्हिसा’संबंधी काळ्या यादीत टाकणे महत्त्वाचे ठरेल.
टॅक्सीवाल्यांनी शिस्त पाळावी
विदेशी नागरिक टॅक्सी व्यवसाय करतात. परंतु त्या टॅक्सी येथील लोकांच्याच असतात. त्यामुळे टॅक्सीवाल्यांची प्रतिमा खराब झाली आहे. ती स्वच्छ करण्याची गरज आहे. आपण ‘ओला कॅब’ला पाठिंबा देत नाही. परंतु त्यांची सेवा चांगली असते हे महत्त्वाचे. टॅक्सीवाल्यांनी शिस्त पाळण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. स्थानिक टॅक्सीवाल्यांना आपली पूर्ण सहानुभूती आहे. परंतु त्यांना वाटेल तसे वागता येणार नाही, असे सांगून सप्टेंबरपर्यंत टुरिस्ट टॅक्सीवाल्यांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ‘अतिथी देवो भव’ हे आपल्या संस्कृतीत आहे. येथे येणार्या पर्यटकांना त्रास होता कामा नये, असेही पर्रीकर यांनी सांगितले. पर्यटकांना त्रास देणार्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.