बेकायदा मिठाई व्यवसायावरील छाप्यात दोन लाखांचा माल जप्त

0
113

वास्को-मायमोळे येथील तळ्याजवळील एका घरात करत असलेला फरसाण, मावा व आईस्क्रीम मिळून सुमारे दोन लाख वीस हजार रुपयांचा बेकायदेशीररित्या माल राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए), कारवाई करून जप्त केला. हा माल नंतर नष्ट करण्यात आला.

गेली अनेक वर्षे बेकायदेशीररित्या येथे खाद्य पदार्थ बनवत असल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. वास्को-मायमोळे येथे तानिया हॉटेल समोरील बांधावर असलेल्या घरात गेली अनेक वर्षे फरसाण, मावा व आईस्क्रीम असे खाद्यपदार्थ बनवण्याचा बेकायदेशीर व्यवसाय होत असल्याची माहिती एफडीएला मिळताच निरीक्षक राजू कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सानिया रोजारीओ, स्नेहा सावंत, सुधाकर पार्सेकर व प्रदीप पार्सेकर यांनी छापा टाकून येथे बनवत असलेला फरसाण, मावा, आईस्क्रीम आदी पदार्थ व सामुग्री जप्त करून नष्ट करण्यात आली.हा बेकायदेशीर व्यवसाय करणारा जेठाराम भाटी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिवाळीच्या सणासाठी हा खाद्यपदार्थ बनवण्यात येत होता असे निरीक्षक कोरडे यांनी सांगितले. याव्यतिरिक्त खारीवाडा भागातही अनेक ठिकाणी बेकायदेशीर मिठाई बनविण्याचा व्यवसाय करत असल्याचा सुगावा लागला असून यावरही लवकरच कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.