हिवाळी पर्यटन

0
541

भाग्यश्री के. कुळकर्णी (पर्वरी)

मोठमोठे महाल, लांबच लांब पसरलेले वाळवंट असलेले राजस्थान…, गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात टेन्टमध्ये राहण्याचा अनुभव…, दार्जिलिंगमधील ट्रेकिंगचा अनुभव… सिमला-कुलु मनालीचे सौंदर्य.., केरला बँक वॉटरमधील एक वेगळाच अनुभव.. असे अगणित..!!
हौस आणि उत्साह याबरोबर योग्य ती माहितीही पाहिजे म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर तारांबळ उडत नाही. चला तर मग या दिवाळीच्या सुटीत या गुलाबी थंडीत भरपूर प्लान आखूयात….

उद्यानांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं बंगळुरू ही कर्नाटकाची राजधानी. नानाविध प्रकारच्या देशी-विदेशी वृक्ष-वेली, रंगीबेरंगी फुलं यांनी बहरलेली, हिरवळी, संगीतावर नृत्य करणारी कारंजी यांमुळे चित्ताकर्षक वृंदावन बाग हे बंगळुरूचं प्रमुख आकर्षण.

दिवाळीची सुटी म्हणजे आता फक्त मामाच्या घरी किंवा आपल्या गावी जाऊन साजरी करण्याइतपतच मर्यादित राहिली नाही, तर आता या सुटीचा आस्वाद बाहेर फिरायला जाऊनही घेता येतो. त्यामुळे एकंदरच सगळ्यांना एक वेगळा अनुभव किंवा चेंज मिळतो. एकतर थंडीचे दिवस म्हणजे भरपूर उत्साह असतो फिरायचा. मला नेहमी वाटते की नेहमीचीच ठिकाणे जरी पाहिली तरी ते पाहण्यात आपला असा एक वेगळा दृष्टीकोन हवा, म्हणजे प्रत्येक प्रदेशाचे वैशिष्ट्य.. त्याचा इतिहास हा तेथील लोकांचे राहणीमान, खानपान अशा छोट्या छोट्या गोष्टीत दडलेले असते. निसर्ग सौंदर्य, त्या त्या ठिकाणची खासीयत, शिवाय रहस्यमय दंतकथा हा तर फारच इंटरेस्टिंग असा अविभाज्य भाग आहे असे वाटते. त्याबरोबरच सगळ्या प्रकारचे प्रवास – जसे रेल्वे, बस, विमान.. खूप मजा येते. शिवाय आजकालच्या या मॉडर्न जमान्यात लोकांचा कल आवर्जून पर्यटनामध्ये पारंपरिकतेकडे असतो आणि त्याचा आवडीने आनंदही घेतात. त्यात काहीसे वेगळेपण म्हणाल, तर काहीतरी ऍडव्हेन्चर आवडते… काहीतरी ऐतिहासिक आवडते… माझ्या मते म्हणाल तर हिवाळ्यातील बेस्ट डेस्टीनेशन्स म्हणजे राजस्थानमधील जयपूर-उदयपूर-जैसलमेर-माउंट अबू इ. महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर.. माथेरान.. भंडारदरा.. ही हिल स्टेशन्स.. अजंता-एलोरा येथील सुप्रसिद्ध लेणी.. इ. जर दुर्गप्रेमी असाल तर महाराष्ट्रातील किल्ल्यांची पर्वणीच लाभेल… केरळमधील मुन्नार, सुलतान बाथरी हे हिल स्टेशन्स.. थेक्काडी हे वाइल्ड लाईफ सँक्च्युअरी… कर्नाटकातील बंगलोक-म्हैसूर-उटी…!!
चला तर मग आज मी माझ्या नजरेतून पाहिलेल्या कर्नाटक राज्याची सैर तुम्हाला करून आणू इच्छिते. या राज्याला प्रचंड असा विजयनगरच्या साम्राज्याचा वारसा आणि इतिहास लाभलेला आहे. सर्वप्रथम पर्यटकांचे आकर्षण असलेले डेस्टीनेशन पाहूयात!!

बंगळुरू-म्हैसूर-उटीचे अनुभव तुम्हा सर्वांशी शेअर करणार आहे. आम्ही कुठल्याही ट्रॅव्हल्स तर्फे गेलेलो नव्हतो. त्यामुळे आमचं आम्हाला ठरवायची मुभा म्हणा किंवा जबाबदारी म्हणा… सर्वकाही आम्हीच होतो. कर्नाटक म्हटले म्हणजे नारळपाणी, मोगरा-अबोलीचे गजरे, जरीकाठाचे घागरे, केळीच्या पानातील इडली-डोसा-उतप्पा..रस्सम भात… अशी खवैय्येगिरी, गोपुरम असलेली मंदिरे आणि कलेनी परिपूर्ण असल्यामुळे म्हैसूर सिल्कची कलादालने… अशी आपसुकच तयार झालेली मनातील चित्र…!!
भारतातील काही मोजक्या सुंदर शहरांपैकी एक आणि सुसंबद्ध योजनापूर्व आखणीचा नमुना म्हणजे बंगळुरू शहर. मोठमोठाले कारखाने, व्यापार-उद्योगांनी भरलेलं असूनही रमणीयता टिकवून असलेलं.. उद्यानांचं शहर म्हणून ख्यातनाम असलेलं बंगळुरू… लांबच लांब रस्ते, विस्तीर्ण हिरवळी, राजप्रासादतुल्य इमारती यामुळे वेधक झालं आहे.

उद्यानांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं बंगळुरू ही कर्नाटकाची राजधानी. नानाविध प्रकारच्या देशी-विदेशी वृक्ष-वेली, रंगीबेरंगी फुलं यांनी बहरलेली, हिरवळी, संगीतावर नृत्य करणारी कारंजी यांमुळे चित्ताकर्षक वृंदावन बाग हे बंगळुरूचं प्रमुख आकर्षण. त्या काळातल्या उत्कृष्ट इंजिनियरिंगचे उदाहरण म्हणून मानल्या गेलेल्या या उद्यानात उष्ण कटिबंध आणि समशीतोष्ण हवामानातील विविध जाती-प्रकारांच्या वनस्पतींचा अजस्त्र बहुमोल संग्रह बघायला मिळतो. येथील सायन्स म्युझिअम व इस्कॉन मंदिराने आमची मने जिंकून घेतली. शिवाय विधानसभेचा भव्य नजारा पर्यटकांचे खास आकर्षण आहे.

कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं म्हैसूर… बंगळुरू -पासून १३८ किमीवर असून बसने फक्त अडीच-तीन तास लागतात. एकाहून एक सरस खानदानी वैभवशाली इमारती, सार्वजनिक उद्यान, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळं यांनी दिमाखदार झालेल्या म्हैसूरला सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये भेट दिल्यास दसर्‍याच्या राजेशाही सणानं रंगमय झालेलं शहर पाहायला मिळेल.
म्हैसूर पॅलेसला अंबविलास पण संबोधले जाते. हिंदू-इस्लामिक वास्तू-शिल्प कलेचं मनोहारी मिश्रण असलेल्या आणि अतिशय नाजूक, कलात्मक नक्षीकाम केलेल्या या मुख्य राजप्रसादातील भव्य दरबार हॉल, कल्याण मंडप, दुर्गा पूजेचं भित्तीचित्र, सोन्याचं सिंहासन, चांदी-हस्तीदंती कोरीव कारागिरीचे दरवाजे इत्यादी दिपवून टाकणारं वैभव पाहताना नयन सुखावतात. शिवाय या पॅलेसचे संध्याकाळचे सौंदर्य हे खूपच विलोभनीय आहे कारण संपूर्ण दिव्यांनी सजवलेला पॅलेस डोळ्यात साठवून घ्यायला वेळही अपुरा पडतो.
इतर राजप्रासादांपैकी ललित महाल हे आता एक पंचतारांकित हॉटेल आहे. अत्याधुनिक स्थापत्यशास्त्राचा एक भव्य नमुना असलेल्या म्हैसूरच्या भूतपूर्व महाराजांच्या राजवाड्याची दर रविवारी दर रविवारी आणि सणासुदीच्या काळात लक्ष-लक्ष दिव्यांची होणारी उजळणही विशेष लक्षणीय आहे. त्याशिवाय सॅन्ड म्युझियम आणि वॅक्स म्युझियम हे अतिशय आकर्षक व बघण्यासारखे आहे. ऐसपैस पिंजर्‍यातील जगातले बरेचसे प्राणी असलेलं म्हैसूरमधील प्राणिसंग्रहालय आवर्जून भेट देण्याजोगं. म्हैसूर शहराला सौंदर्य प्राप्त करून देणार्‍या चामुंडी हिलवरील द्रविड शैलीतील अद्वितीय असे चामुंडेश्‍वरीचं मंदिर आणि अखंड शिळेतून बनवलेला नंदी आहे. या चामुंडी टेकडीवरच महिषासुराची शस्त्रसज्ज, भव्य, उग्र मूर्ती असून महिषासुरामुळेच म्हैसूर हे नाव या गावाला मिळालं असावं. टेकडीवरून म्हैसूर शहराचं, विशेष करून रात्रीच्या वेळी विलोभनीय दर्शन घडतं. म्हैसूरच्या उत्तरेस १६ कि.मी.वर असलेल्या श्रीरंगपट्टम या टिपू सुलतानच्या राजधानीच्या गावी किल्ल्यांसह अनेक ऐतिहासिक स्मारकं आहेत.

उटकमंड किंवा उटी हे निलगिरी पर्वतातील २२८६ मीटर्स उंचीवरील अत्युत्तम सुष्टीसौंदर्याचा वरदहस्त लाभलेलं थंड हवेचं ठिकाण. तामिळनाडूत असलं तरी म्हैसूरहूनच तेथे जाणं जास्त सोयीचं. म्हैसूरहून निघणार्‍या उटीच्या रस्त्यामध्ये बंदिपूरच्या अभयारण्याचाही समावेश असतो. कारण हा रस्ताच बंदिपूर आणि तामिळनाडूतील मदुमलाई अभयारण्यातून जातो. मुख्यतः व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात हरणं, गवे, चित्ते, हत्ती इत्यादी प्राणीही दिसू शकतात. जीप, मेटॅडोअर अगर हत्तीवरून हिंडता येतं. आम्ही हा अनुभव वा ऍडव्हेन्चर शेवटी घेतलं.

सर्वसाधारणपणे आपण एखाद्याच्या घरी जातो तेव्हा कळवून जातो पण इथे मात्र सगळेच (पर्यटक) ‘‘आओ जाओ घर तुम्हारा’’ असल्यासारखे वावरताना दिसले. मग, ‘‘आई, ते वन्यप्राणी आपल्याला दिसतील?’’ या माझ्या मुलाच्या प्रश्‍नाचे उत्तर द्यायला बिचकायला झाले. तरीही ‘अतिथी देवो भव’ या भावनेने काही जणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदरातिथ्य केले. मान्यवरांनी उपस्थिती लावली नाही हेच बरे झाले कारण गाईडने ऑलरेडी किस्से सांगून व्हर्च्युअल भेट अशी काही घालून दिली होती की प्रत्यक्ष बघण्याची हौसच भागवली.

उटीला जाताना कर्नाटक आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवर स्थित हे बंदीपूर जंगल…!!! या जंगलाच्या सफरीने न बोलता बरंच काही कथन केलं…. एके काळी वीरप्पन नावाच्या वादळाने जो काही उच्छाद मांडला होता त्या माहोलचा अनुभव घेतला. शिवाय उदास, उजाड, भयाण अशा जंगलातही सौंदर्य टिपण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न सफल झाला… वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या कंन्स्ट्रक्शनची वारुळे…!! हिल स्टेशन्सची सम्राज्ञी म्हणता येईल, अशा उटीची शान म्हणजे इ.स. १८४७ मध्ये निर्मिण्यात आलेलं बोटॅनिकल गार्डन. विविध वृक्षवेलींचं संमेलन असलेलं, विस्तीर्ण मखमली हिरवळीचं हे वनस्पती उद्यान पाहून लक्षात येते की प्रत्येक सिनेमातील एका तरी गाण्याची इथे शूटिंग झालेली असणार.

निलगिरीतील सर्वोच्च शिखर दोडाबेट्टा हे होय. उंच, गर्द झाडीच्या रस्त्याने दोडाबेट्टाला गेल्यावर वरून आसमंताचं अतिशय मनोवेधक दृश्य दिसतं. चहाचे मळे/बागा आणि पाईन व निलगिरीच्या झाडांनी आच्छादलेला हा सुरेख परिसर अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीला लाभलेले वरदान आहे.
बंगळुरू-म्हैसूर-उटी ही झाली कर्नाटकातील रूळलेली सहल. पण विजापूर-बदामी-ऐबोळपट्टदकल-हंपी या सहलीसाठी सुद्धा उत्तम मोसम म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिने. पावसाळा एक वेळ चालू शकेल परंतु तीव्र उन्हाळा असल्यानं त्यावेळी जायचं टाळावं.

सामर्थ्यशाली विजयनगरच्या या सुप्रसिद्ध राजधानीच्या शहराला विशेष शोभा प्राप्त करून दिली होती ती तेथील मंदिरांनी, त्यांतील बरीचशी आजही बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत. विठ्ठल मंदिर, पंपापती मंदिर आणि हजारीराम मंदिर ही त्यांतील सर्वांत मोठी.

हंपीतील सर्वोत्तम शिल्प म्हणजे विजय विठ्ठल मंदिर. विजयनगर वास्तुशिल्पाचा हा अजोड नमुना १६ व्या शतकात निर्मिला गेला. तसेच बदामी येथील सुप्रसिद्ध लेण्या आणि भूतनाथ मंदिर हे पर्यटकांचे विशेष आकर्षण होय. आदिलशाही वंशातील राजांची राजधानी असलेल्या विजापूरमध्ये शिल्पशास्त्राचे दृष्टीने उत्कृष्ट अशा ऐतिहासिक स्मृती जागविणार्‍या अनेक वास्तू आहेत. त्यातील मेरूमणी म्हणजे आदिलशाही घराण्याचा ७ वा राजा महम्मद आदिलशाहा (१६२७-५६) कव्वर म्हणजे ‘गोलघुमट’, चार बाजूला चार सातमजली मिनार आणि मध्ये ५१ मीटर्स उंची आणि ३७ मीटर्स व्यासाचा एकही खांब नसलेला प्रचंड घुमट असे काही संलग्न जोडलेले आहेत की बघणारा आश्चर्यचकित होऊन जातो. मिनारच्या सात मजल्यांच्या १६१ पायर्‍या चढून गेल्यावर असलेल्या आवढव्य घुमटात अनेक प्रतिध्वनी निर्माण करणारी ‘व्हीसपरिंग गॅलरी’ आहे. घुमटाच्या भिंतीला कान लावला असता दुसर्‍या बाजूची घड्याळाची टिकटिकसुद्धा स्पष्ट ऐकू येते.

स्थापत्यशास्त्राची किमयागार अशी ही जगप्रसिद्ध वास्तू पाहताना आपले डोळे दिपून जातात. विजापूरमध्ये अनेक थडगी, मशीद, कबरी आहे. जुम्मा किंवा जमा मशीद या विजापुरमधील पहिल्या सर्वांत मोठ्या मशिदीला ३०० लहानमोठे घुमट असून तीत एकावेळी हजारो लोकांना प्रार्थना करता येते. शेवटच्या आदिलशहाची १२ कमानी सारखी अधुरी वास्तू आहे. चालुक्यांच्या शेवटच्या राजधानीचं गाव पट्टकदळ. पट्टकदळला दहा मुख्य मंदिरांचा समूह असून अनेक लहान मंदिरं आहेत. दुसरा विक्रमादित्य आणि त्याची कलाप्रेमी राणी लोकमहादेवी आणि त्रैलोक्य महादेवी यांनी कांचीपुरम येथून कारागीर आणून येथील मंदिराची उभारणी केली. विरुपाक्ष हे पट्टकदलचं मुख्य मंदिर. याशिवाय मल्लिकार्जुन मंदिर, संगमेश्‍वर मंदिर, पापनाथ, जाबुलिंग मंदिर… इ. पर्यटकांची आकर्षण स्थळे आहेत.

ही झाली अनुभव घेतलेली प्रेक्षणीय स्थळे.. जिथे कायमच अतिथी देवो भवची प्रचिती आलीय. पण अजूनही ड्रीम डेस्टिनेशन्स बाकी आहेत. जसे मोठमोठे महाल, लांबच लांब पसरलेले वाळवंट असलेले राजस्थान…, गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात टेन्टमध्ये राहण्याचा अनुभव…, दार्जिलिंगमधील ट्रेकिंगचा अनुभव… सिमला-कुलु मनालीचे सौंदर्य.., केरला बँक वॉटरमधील एक वेगळाच अनुभव.. असे अगणित..!!
हौस आणि उत्साह याबरोबर योग्य ती माहितीही पाहिजे म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर तारांबळ उडत नाही. चला तर मग या दिवाळीच्या सुटीत या गुलाबी थंडीत भरपूर प्लान आखूयात आणि सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा!!!