बेकायदा गाडे हटवण्याचे काम मनपाकडून सुरू

0
150

पणजी महापालिकेने शहरातील बेकायदेशीर गाडे हटवण्याचे काम हाती घेतले आहे, असे महापौर विठ्ठल नाईक चोपडेकर यांनी काल सांगितले. महापालिकेने परवाना दिलेले ९२ गाडे शहरात आहेत. ते सोडल्यास अन्य बेकायदेशीर गाडे हटवण्यात येणार असून बुधवारपासून ते काम सुरूही झाले असल्याचे चोपडेकर यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी पणजीचे महापौर, महापालिका आयुक्त, पणजीतील व्यापारी व रेस्टॉरन्ट मालक यांची नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याबरोबर बैठक झाली असता व्यापारी व रेस्टॉरन्ट मालक यांनी पणजी शहरातील बेकायदा गाड्यांचा प्रश्‍न मंत्र्यासमोर उपस्थित केला होता. महापालिकेला कोणताही कर न भरणारे हे गाडेवाले रस्सा आमलेट, चिकन, पावभाजी, बिर्याणी आदी अन्न पदार्थांची विक्री करीत असतात. परिणामी महापालिकेला कर देणार्‍या रेस्टॉरन्टवाल्यांनी बेकायदा गाडे हटवण्याची मागणी केली होती. बुधवारपासून (काल) शहरातील चर्च स्न्वेअर जवळ असलेले गाडे हटवण्याचे काम हाती घेतल्याचे ते म्हणाले. काही गाडेवाले त्यांना ज्या खाद्य पदार्थांची विक्री करण्यास परवानगी आहे त्या पदार्थांपेक्षा जास्त खाद्य पदार्थांची विक्री करीत असल्याचेही आढळून आले असल्याचे चोपडेकर यांनी स्पष्ट केले.

ऑनलाईन करभरणा
सुविधेस विलंब लागणार

शहरातील व्यापारी व रेस्टॉरन्टवाले यांनी विविध कर भरण्याची सुविधा ऑनलाईन करण्यात यावी अशी जी मागणी केलेली आहे त्यासंबंधी विचारले असता सध्या घरपट्टी व व्यापारी परवाना शुल्क या दोनच गोष्टी ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध आहे. अन्य कर भरण्यासाठीची सुविधा ऑनलाईन करण्यास थोडा विलंब लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.