चर्चने गोव्याच्या विकासावर चर्चा घडवावी ः सरदेसाई

0
105

गोव्याचा विकास करण्यासाठी जे काही करणे शक्य आहे त्यावर चर्च संस्थेने चर्चा घडवून आणावी. गोव्याचा विकास कसा होणार, गोमंतकीयांना काय हवे अशा विषयांवर चर्चने चर्चा घडवून आणण्याची गरज आहे असे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

चर्च संस्थेचा एक घटक फक्त संघर्ष करू पाहत असल्याचे सरदेसाई यांनी पत्रकात म्हटले आहे. गोमंतकीयांना काय नको हे सांगण्याऐवजी काय हवे ते चर्चने सांगितल्यास त्याचा गोव्याला फायदा होईल असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ‘गोंयचो आवाज’ संघटनेच्या उद्या २७ रोजी मडगाव येथे होणार असलेल्या सभेतून २०२१ च्या प्रादेशिक आराखड्याखाली कुठल्याही राजकीय नेत्याने बेकायदेशीररित्या जमिनीचे रुपांतर केले असल्याचे पुराव्यासह दाखवून दिले तर आपण सदर नेता किंवा नेत्यांवर कारवाई करण्यास तयार असल्याचेही सरदेसाईंनी स्पष्ट केले आहे.

गोंयचो आवाज संघटनेने आपल्या सभेतून २०२१ च्या प्रादेशिक आराखड्याखाली गोव्यातील ज्या राजकीय नेत्यांनी बेकायदेशीररित्या जमिनीचे रुपांतर केलेले आहे त्यांच्या नावाची यादी जाहीर केल्यास आपणाला आनंदच होईल, असे त्यांनी नमूद केले आहे. चर्चेसाठीही आपली दारे सदैव खुली असल्याचे सरदेसाई यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.