>> खाण पीडितांनी वेधले संचालकांचे लक्ष
सांगे, केपे, कुडचडे आदी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खाण व्यवसाय चालू असून अनियंत्रित अशा प्रदूषणाला स्थानिक जनतेला सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती वरील भागातून काल पणजीत खाण अधिकार्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या पीडित लोकांनी पत्रकारांना दिली.
या खाणग्रस्तांच्या एका
शिष्टमंडळाने आम आदमी पार्टीचे नेते वाल्मिकी नाईक व रवींद्र वेळीप यांच्या नेतृत्वाखाली खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन राज्यात बेकायदेशीर खाण व्यवसाय चालू असून तो बंद पाडावा, अशी त्यांच्याकडे मागणी केली. मात्र, आचार्य यांनी यावेळी राज्यात बेकायदा खाण व्यवसाय चालू असल्याचा आरोप ङ्गेटाळून लावताना सर्व खनिजवाहू ट्रकांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आलेली आहे व खाण खात्याचे खाण उत्खनन व खनिजवाहू ट्रकांवर बारीक लक्ष असल्याचे सांगितले.
प्रचंड प्रदूषण
सोनशी तसेच अन्य खाण परिसरात प्रचंड प्रदूषण चालू आहे. खनिजवाहू ट्रकांमुळे वायू प्रदूषण कधी नव्हे एवढे वाढले असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने खाण संचालकाच्या नजरेत आणून दिले. मात्र, वायू प्रदूषणासंबंधी तोडगा काढण्यात आलेला असून सोनशीमधील वाहतूक गावाबाहेरून करण्यात येत असल्याचे आचार्य यांनी यावेळी सांगितले. सोनशी येथून रोज १० हजार ट्रक खनिज माल घेऊन जात असून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खाण व्यवसाय चालू असल्याचा आरोप वाल्मिकी नाईक, रवींद्र वेळीप यांनी केला. मात्र, आचार्य यांनी हे खरे नसल्याचे सांगून सोनशीतून रोज १४०० ट्रक खनिजाची वाहतूक करीत असून १० हजार ट्रक वाहतूक करीत असल्याचा आरोप खोटा असल्याचा दावा केला. यावेळी शिष्टमंडळातील सदस्य व खाण संचालक प्रसन्न आचार्य यांच्यात काही वेळ वाद
झाला.