हीरो इंडियन सुपर लीगमध्ये गतविजेत्या बेंगळुरू एफसीला घरच्या मैदानावरील सलामीस नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. गतमोसमात प्ले-ऑफमध्ये नॉर्थईस्टचे कडवे आव्हान मोडून काढलेल्या बेंगळुरूला जेतेपद राखण्याच्या मोहीमेस विजयी प्रारंभ करता आला नाही. गोल झाला नसला तरी उल्लेखनीय चालींमुळे चुरस झाली.
येथील श्री कांतीरवा स्टेडियमवरील लढतीत दोन्ही संघांनी संधी दवडल्या. त्यामुळे कोंडी सुटू शकली नाही. बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू आणि नॉर्थईस्टचा शुभाशिष रॉय यांनी आपापले नेट सुरक्षित राखले. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
सातव्या मिनिटाला नॉर्थईस्टच्या राकेश प्रधानची घोडदौड करीत उदांताला रोखली. बेंगळुरूने चेंडूवर सरस ताबा राखत चाली सुरु ठेवल्या. १३व्या मिनिटाला आगुस्टोने एका प्रतिस्पर्ध्याला चकवित मॅन्युएल ओन्वूला डावीकडे पास दिला. ओन्वूने बॉक्समध्ये प्रवेश केला, पण नॉर्थईस्टच्या रेगन सिंगने मार्कींगची जबाबदारी चोख पार पाडत त्याला बाजूला जाण्यास भाग पाडले. ओन्वूने क्रॉस शॉट मारला, पण तो फिनीशिंग साधू शकला नाही.
नॉर्थईस्टने २१व्या मिनिटाला पहिला प्रयत्न केला. मार्टिन चॅव्हेजने उजवीकडून बॉक्सलगत चेंडू मारला, पण बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने चपळाईने बचाव केला.
दुसर्या सत्राच्या प्रारंभी बेंगळुरूच्या आगुस्टो-उदांता, तर नॉर्थईस्टच्या ज्योस लेयूडो यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. ५२व्या मिनिटाला आसामोह ग्यान याने चॅव्हेजच्या पासवर मारलेला चेंडू नेटच्या बारला लागला. निशू कुमार, रेगन यांचेही प्रयत्न फोल ठरले. अंतिम टप्यात हेच चित्र कायम राहिले.