महाआघाडीशी फारकत घेत बिहारात भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा सरकार स्थापन करीत मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले संयुक्त जनता दलाचे (जदयू) नेते नितीश कुमार यांनी काल बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. बहुमत सिद्ध करण्यासाठी जदयू-भाजप आघाडीला १२२ आमदारांची साथ हवी होती. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १३१ तर विरोधात १०८ आमदारांनी मतदान केले.
राजदचे नेते लालूप्रसाद व कॉंग्रेसशी युती तोडून राजीनामा दिल्यानंतर केवळ १२ तासांमध्ये नितीशकुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर काल त्यांनी अपेक्षेनुसार बहुमत सिद्ध केले.
बिहार विधानसभेत एकूण २४३ जागांपैकी राजदकडे ८०, जदयू ७१, कॉंग्रेस २७ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे तीन जागा आहेत. एनडीए युतीने काल राज्यपालांकडे सादर केलेल्या पत्रात १३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्यात जदयूच्या ७१, भाजपच्या ५३, आरएरएसपीच्या २, एलजेपीच्या २ व एचएएमच्या एका व तीन अपक्षांचा समावेश होता. मात्र, आजारी असल्याने भाजपचे आमदार भूषण पांडेय यांनी मतदान केले नाही. दरम्यान, नितीशकुमार यांच्या नव्या सरकारने बहुमत सिद्ध केल्याने आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. यामध्ये भाजपच्या १४ जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.