बिहारमधील कटिहार येथे शनिवारी उशिरा संध्याकाळी बस आणि पीकअपच्या धडकेत 13 लोकांचा मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील 5 लोक होते. मृतांमध्ये 10 महिला, 2 पुरुष आणि एक लहान मुलगी आहे. यात 11 मृत पूर्णिया जिल्ह्यातील रहिवासी होते, तर दोघे कटिहारचे होते. अपघातात 32 हून अधिक जखमी झाले आहेत. यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. बसच्या धडकेनंतर लोकांचे मृतदेह रस्त्यावर विखुरले गेले. अपघाताच्या वेळी चालकाने मद्यप्राशन केले होते. गाडीचा वेगही 100 पेक्षा जास्त होता. बस चालकाने आधी एका बाईकला धडक दिली, त्यानंतर पिकअपला धडक दिली. पीकअपमधील सर्वजण झारखंडमधून जत्रा पाहून परत येत होते. अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2-2 लाख आणि जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.