बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप अखेर निश्चित

0
10

>> भाजपला 17, जेडीयूला 16 अन्‌‍ एलजेपीला 5 जागा; भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत

लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) जागावाटपाबाबत एकमत झाले. बिहारमध्ये भाजप 17 जागा लढवणार आहे. जनता दल संयुक्त (जेडीयू) 16 जागा देण्यात आल्या आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (एलजेपी) 5, जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला (हम) 1 आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षाला 1 जागा देण्यात आली आहे.

नितीश कुमार यांचा जनता दल (संयुक्त) हा सत्ताधारी पक्ष एनडीएत सहभागी झाल्यामुळे राज्यात एनडीएची ताकद वाढली आहे; परंतु एनडीएतील मित्रपक्षांची संख्या वाढल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता; परंतु एनडीएतील प्रमुख नेत्यांनी हा तिढा सोडवला आहे. एनडीएतील पक्षांनी राज्यातील 40 लोकसभा मतदारसंघांचे वाटप पूर्ण केले आहे. बिहार भाजपाचे प्रभारी विनोद तावडे यांनी राज्यातील एनडीएच्या जागावाटपाबाबत माहिती दिली. तावडे यांनी राज्यातील एनडीएच्या नेत्यांबरोबर पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. बैठकीत ठरलेला जागााटपाचे सूत्र आमच्या सर्व पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी मान्य केले आहे, असे तावडे म्हणाले.

बिहारमधील लोकसभेच्या एकूण 40 जागांपैकी भाजप 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. म्हणजेच तो मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल. नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल संयुक्त (जेडीयू) 16 जागांवर निवडणूक लढवणार आहे. चिराग पासवान यांचा एलजेपी (आर) 5 जागांवर निवडणूक लढवणार आहे. जीतन राम मांझी यांचा हम पक्ष एका जागेवर निवडणूक लढवणार आहे. उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षाला एक जागा दिली आहे.

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. गेल्या वेळी सात टप्प्यात मतदान झाले होते. यावेळी फक्त तारखा बदलल्या असून प्रत्येक टप्प्यातील जागा सारख्याच राहिल्या आहेत.
इतरांना कुठले मतदारसंघ?
चिराग पासवान यांच्या पक्षाला वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर, खगरिया आणि जमुई या जागा देण्यात आल्या आहेत. जीतन राम मांझी यांचा हम पक्ष गया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. करकटची जागा उपेंद्र कुशवाह यांना देण्यात आली आहे.

भाजपच्या जागा
पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, औरंगाबाद, मधुबनी, अररिया, दरभंगा, मुझफ्फरपूर, महाराजगंज, सारण, उजियारपूर, बेगुसराय, नवादा, पटना साहिब, पाटलीपुत्र, आराह, बक्सर आणि सासाराम.

जेडीयूच्या जागा
वाल्मिकी नगर, सीतामढी, झांझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, जेहानाबाद आणि शिवहार.