अति तीव्र बनून भारतीय किनारपट्टीवर उत्पात घडवू पाहणारे बिपरजॉय चक्रीवादळ अखेर थंडावत चालले आहे. तत्पूर्वी त्याने गुजरातला तडाखा दिलाच. गुजरातच्या किनारपट्टीवरील किमान चार हजार सहाशे गावांमध्ये या वादळामुळे मोठी हानी झाली आहे. विजेचे पाच हजार खांब उन्मळल्याने जवळजवळ 940 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. सहाशेच्या वर झाडे पडली आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या वादळातही मोठी प्राणहानी टळली ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. आपल्या प्रशासनाच्या सतर्कतेमुळेच प्राणहानी टळल्याचा दावा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केला आहे. त्यामागचा राजकीय श्रेयवाद सोडला, तरी राज्य व केंद्र सरकार या चक्रीवादळाचा सामना करण्यास यावेळी पुरेसे सज्ज होते हे निश्चित. त्यामुळेच किमान प्राणहानी टाळण्यात सरकारला यश आले आहे.
प्रशासकीय सज्जतेचे मुख्य कारण म्हणजे या चक्रीवादळाविषयी नेमके पूर्वानुमान भारतीय हवामान खात्याने सुरवातीपासून वर्तवले होते. आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळेच हे शक्य झाले याची येथे विशेष नोंद केली पाहिजे. एकेकाळी भारतीय वेधशाळेचे अंदाज हा विनोदाचा विषय असे. ज्या दिवशी पाऊस पडेल असे वेधशाळा सांगेल, नेमका त्या दिवशी तो पडत नाही असे लोक म्हणायचे. परंतु आता तो काळ राहिलेला नाही. भारतीय वेधशाळा जगातील कोणत्याही वेधशाळेएवढीच तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. स्कायमेटसारखी खासगी संस्था जो अंदाज वर्तवते, त्यापेक्षाही भारतीय वेधशाळेचे अंदाज अधिक खात्रीलायक असतात असे अनेकदा दिसून आले आहे. भारतीय हवामान खात्याकडे न्यूमरीकल वेदर प्रेडिक्शन मॉडेल पंधरा वर्षांपासून आहे. परंतु आता त्याला आधुनिक रडार आणि उपग्रहांद्वारे येणाऱ्या माहितीची जोड मिळत असल्याने त्या अनुमानांची अचुकता वाढलेली दिसते. बिपरजॉय चक्रीवादळ अरबी समुद्रात गोव्यापासून नऊशे किलोमीटरवर जवळजवळ अकरा दिवस ठाण मांडून होते. एवढा दीर्घ काळ हे वादळ तेथे का स्थिरावले त्याबाबत हवामानतज्ज्ञांचे म्हणणे असे की, समुद्राच्या पाण्याची उष्णता, तेथील आर्द्रता, पृष्ठभाग या सगळ्याचा हा परिणाम असतो. अरबी समुद्राचा पृष्ठभाग बंगालच्या उपसागरापेक्षा मोठा असल्याने ते तेथे अधिक काळ स्थिरावले असे त्यांना वाटते. दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेले क्यार चक्रीवादळही असेच अरबी समुद्रात नऊ दिवस होते. त्यानंतरच ते भूभागाला धडकले होते. बिपरजॉय समुद्रातून कुठल्या दिशेने कसे जाईल याचे अनुमान भारतीय हवामान खात्याने अचूक वर्तवले होते. त्यातही अर्थातच वर उल्लेख केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मोठी मदत झाली. उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे, वेधशाळांकडे असलेली डॉप्लर आणि इतर रडार यंत्रणा, आकडेवारीची गणिते मांडून त्यांच्या सुपरकॉम्प्युटरांनी वर्तवलेला अंदाज या सगळ्याच्या माध्यमातून हे वादळ कुठे कधी पोहोचेल, त्याची तीव्रता किती असेल, त्याचा परिणाम कोणकोणत्या भागावर कसा होईल हे सगळे पूर्वानुमान यावेळी अचूक वर्तवले गेलेले दिसले. त्यामुळे प्रशासनाला सतर्कता बाळगता आली. गुजरातच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याची चिन्हे दिसताच केंद्र सरकार आणि गुजरात सरकार कामाला लागले. किनारपट्टीच्या गावांतील हजारो लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफने मदत पथके तैनात केली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे तर सर्व शक्तीनिशी गुजरात सरकारच्या पाठीशी उभे होते. त्यांनी तिन्ही सेनादलप्रमुखांची बैठक घेऊन सज्जतेचे आदेश दिलेले होते. त्यामुळे सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली होती. रेलगाड्या आधीच थांबवण्यात आल्या होत्या. शिवाय हे वादळ गुजरातला धडकले तेव्हा मध्यरात्रीची वेळ होती. ह्या सगळ्यामुळे प्रत्यक्ष मोठी प्राणहानी टळली. अर्थात, मुसळधार पाऊस आणि झंझावाती वारे यामुळे झाडे आणि विजेचे खांब पडणे, महामार्गांवर पाणी येणे हे सगळे अपरिहार्य होते. मात्र, सरकारने तैनात केलेली मदत पथके वेळीच कामाला लागली हे महत्त्वाचे आहे. या वादळामुळे झालेली नासधूस लवकरात लवकर दूर सारून राज्याचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी गुजरातच्या प्रशासनाने कंबर कसली आहे. एखादे वादळ कसे हाताळावे याचा वस्तुपाठ म्हणून बिपरजॉय चक्रीवादळाचा अभ्यास करण्यासारखा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आणि सरकारच्या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवला तर मोठ्यातल्या मोठ्या आपत्तीला तोंड देता येते. पूर्वसूचना आणि पूर्वनियोजन या दोन गोष्टींमुळेच ह्या एवढ्या मोठ्या तीव्रतेच्या चक्रीवादळाचा तडाखा गुजरात राज्य सोसू शकले. यापुढेही अशी चक्रीवादळे येतील तेव्हा सुसज्जता आणि समन्वयाने त्यांचा सामना करता आला तर किमान प्राणहानी तरी निश्चित टळेल.